भाजपकडून जास्तच जास्त `आयारामां`ना उमेदवारी

भाजपकडून जास्तच जास्त आयारामांना उमेदवारी दिल्याचं दिसून येत आहे. मात्र पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये याबाबतीत अस्वस्थता वाढतांना दिसून येत आहे.

Updated: Mar 31, 2014, 10:03 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, दिल्ली
भाजपकडून जास्तच जास्त आयारामांना उमेदवारी दिल्याचं दिसून येत आहे. मात्र पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये याबाबतीत अस्वस्थता वाढतांना दिसून येत आहे.
पक्षातील ज्येष्ठ नेते असूनही उमेदवारी न मिळालेले `जसवंत सिंह` यांच्यासह, आपल्याला उमेदवारी न मिळाल्यामुळे अस्वस्थ असलेल्या `नाराजां`ची संख्या वाढली आहे.
१६ व्या लोकसभेसाठी भाजपतर्फे आतापर्यंत ४०९ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यापैकी तब्बल ५६ उमेदवार हे अन्य पक्षातून `आयात` केलेले वा नव्याने पक्षात दाखल झाले आहेत..
भाजपतर्फे ज्या ५६ आयारामांना उमेदवारी देण्यात आली त्यापैकी २८ उमेदवार राजकीयदृष्टय़ा `कळीच्या` अशा उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांमधील आहेत.
बिहारमधील एकूण ३० जागांपैकी १० जागांवर तर उत्तर प्रदेशातील ७५ उमेदवारांपैकी १८ जागांवर नव्याने पक्षात आलेल्या व्यक्तींची वर्णी लागली आहे.
हरयाणात तर, आठपैकी पाच जागांवर भाजपतर्फे अशा नुकत्याच पक्षप्रवेश केलेल्यांना तिकिटे देण्यात आली आहेत.
पक्षांतर्गत अस्वस्थता आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी गेले सहा महिने आम्ही पक्षाच्या विजयासाठी मेहेनत करीत आहोत.
पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. असे असताना `आयारामां`ना उमेदवारी दिल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे.
पक्षाने इतरांना तिकिटे देऊ नयेत असे आमचे म्हणणे नाही, मात्र इतक्या मोठय़ा प्रमाणावर आयारामांवर `कृपादृष्टी` व्हावयास नको होती, अशी भावना बिहारमधील एका भाजप नेत्याने व्यक्त केली.
कार्यकर्त्यांमध्ये असलेला असंतोष हा स्वाभाविक असला तरी विजयाच्या भावनेने ते एकदिलाने काम करतील आणि `अस्वस्थ` जसवंतांचा राग शांत होईल, अशी आशा भाजपच्या निवडणूक व्यवस्थापकांकडून व्यक्त केली जात आहे. `आंतले आणि बाहेरचे` हा संघर्ष कायमच असतो पण त्याची तीव्रता फार काळ टिकत नाही, अशा आशावादही भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.