www.24taas.com, झी मीडिया, पाटणा
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नीतीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. नीतीश कुमार यांनी आज राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करून बिहार विधानसभा भंग करण्याची मागणी केलीय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीत जेडीयूला तोंडघशी पडावं लागल्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी नीतीश कुमार यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. आज सायंकाळी 5 वाजता ते याबद्दल मीडियासमोर स्पष्टीकरण देणार आहेत. लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये नीतीश कुमार यांच्या पक्षाला म्हणजेच जेडीयूला 40 पैंकी केवळ दोन जागांवर कसाबसा विजय मिळवता आला.
मोदी लाटेमुळे बिहारमध्ये राजद आणि जेडीयूचं कसं पानीपत झालंय ते 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या आकड्यांवर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल...
बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागांपैकी भाजपला 2009 मध्ये 12 जागांवर यश मिळालं होतं... तर 2014 च्या निवडणुकीत भाजपनं तब्बल 31 जागांवर आपला झेंडा फडकावलाय. मोदी लाटेमुळेच भाजपला 2009 च्या तुलनेत 21 जागांची वाढ मिळालीय, असं म्हटलं जातंय.
काल पार पडलेल्या मतमोजणीनंतर लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा धुव्वा उडालाय.... लालुंच्या पत्नी राबडीदेवी, मुलगी मिसा भारती यांचाही पराभव झालाय. तर नीतीश कुमारांच्या जेडीयूला केवळ दोन जागा मिळाल्या... इतकंच नाही तर जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांनाही पराभवाचा धक्का बसलाय.
बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबलावर एक नजर
जेडीयू - 115 जागा
भाजप - 91 जागा
राजद - 22 जागा
काँग्रेस - 4 जागा
इतर - 11 जागा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.