www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप यांच्यातील जवळीक अधिकच वाढ असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. आज राज यांची भेट घेण्यासाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि नेते विनोद तावडे कृष्णकुंजवर पोहोचले. त्यांच्यात चर्चा सुरू झाली आहे.
याआधी मुंबईत एका हॉटेलमध्ये भाजप नेते नितिन गडकरी आणि राज यांच्यात गुप्त बैठक झाली होती. त्यानंतर भाजपच्या मित्र पक्षांमध्ये बरीच चर्चा झाली. शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. `सामना` या मुख्यपत्रातून गडकरींवर झोड उठविली. त्यावर गडकरींनी नाराजी व्यक्त केली होती. या भेटीचे समर्थन करताना गडकरींनी मी सर्वांनाच भेटत असतो असे स्पष्ट केले.
दरम्यान, गडकरी यांच्या आधी गोपीनाथ मुंडे यांनीही भेट घेतल्याचे पुढे आले. याबाबत राज यांची भेट घेतल्याची कबुली मुंडे यांनी दिली. तसेच फोनवर बोलणे झाल्याचेही म्हटले होते. त्यामुळे भाजपची जवळीक मनसेबरोबर वाढत असल्याचे दिसत आहे. आज विनोद तावडे आणि आशिष शेलार कृष्णकुंजवर गेल्याने याला अधिक दुजोरा मिळाला आहे. चर्चा सुरूच असून बोलणी फिस्कटलेली नाहीत, असेच दिसून येत आहे.
तर दुसरीकडे राज्यात तिसरी आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. निमित्त होते शेकापचे नेते जयंत पाटील आणि जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांनी गुरुवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचे. त्यामुळे मनसे कात टाकते आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे.
मनसेसह तिसरी आघाडी तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यातील लहान-लहान पक्षांची मोट बांधून हा पर्याय उभा करण्यासाठी शेकापचे जयंत पाटील आणि जनसुराज्यचे विनय कोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर सहकार्यांशी चर्चा करून एक-दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे राज यांनी या दोघांना सांगितले असल्याचे दिसून येत आहे. याबाबत कोरे यांनी मीडियाला माहिती दिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.