www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिलेल्या उमेदवारालाच इथल्या मतदारांनी चीतपट केलं... नेहमीच संघर्षाचं, प्रस्थापितांच्या विरोधाचं आणि त्याचवेळी नवनव्या प्रवाहांना स्वीकारणारं राजकारण करणा-या पश्चिम महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या कोल्हापूर मतदारसंघाचं ऑडिट आपण करणार आहोत.
दक्षिण काशी... करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी म्हणजे कोल्हापूर नगरी... जुलमी मुघल राजवटीची धुळदाण उडवुन स्वराज्य अन् सुराज्य प्रस्थापित करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभुमी... शिवरायांनी स्थापिलेल्या सार्वभौम स्वराज्याच्या रक्षणाची आन घेवुन लढलेल्या रणरागिणी छत्रपती ताराराणीही याच भुमीतील.. प्रजेचं कल्याण व्हावं प्रजा सुखी संतुष्ट रहावी, जाती पातीच्या भिंती मोडुन निधर्मी राज्यात सर्व जातीधर्माचे लोक गुण्या गोविदांने रहावेत, वाड्या वस्त्यावर दीन दुबळे दलित यांच्या झोपडीपर्यत शिक्षणाची गंगा पोहोचावी यासाठी क्रांतिकारी निर्णय घेणा-या रजतेचा राजा राजर्षी छत्रपती शाहु महाराजांची ही भुमी.. ऐतीहासीक,सांस्कृतीक वारसा लाभलेल्या या कोल्हापूर नगरीला मराठी चित्रपटाचं माहेरघर म्हणुनही ओळखलं जातं.. कुस्तीची पंढरी म्हणुनही या करवीर नगरीची ओळख....कोल्हापूरी चप्पल, कोल्हापूरचा तांबडा पाढरा रस्सा, कोल्हापूरी साज ठुशी, कोल्हापूरी गुळ अशा अनेक कारणांने कोल्हापूर जिल्ह्याचं नावं देशाच्या नकाशात ठळक अक्षरांत कोरलेलं पहायला मिळतं.
कोल्हापूरच्या सभोवती असणा-या उपनगरांबरोबर छोटीमोठी गावं आणि शहरही झपाट्यानं विस्तारतायत. कोल्हापूर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो.
2009 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात एकुण 15 लाख 75 हजार 932 मतदारांचा समावेश होता. त्यामध्ये पुरुष मतदार 7 लाख 96 हजार869 इतके होते, तर स्री मतदार 7 लाख 79 हजार63 इतके होते.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा गड...सुरवातीच्या काळात या लोकसभा मतदारसंघावर स्वतंत्र काँग्रेसचा, त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचा आणि पुन्हा काँग्रेस पक्षाचा प्रभाव होता. काँग्रेसचा हा गड राष्ट्रवादी पक्षानं 1999 च्या निवडणुकीत सर केला. पण दहा वर्षानंतर 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला आपला बालेकिल्ला गमवावा लागला. त्या ठिकाणी अपक्ष म्हणून राष्ट्रवादीचे तत्कालिन बंडखोर उमेदवार सदाशिवराव मंडलिक खासदारपदी निवडून आले.
1957 मध्ये भाउसाहेब महागावकर शेतकरी कामगार पक्षाकडून निवडून आले. 1962च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या व्ही. टी. पाटील यांनी विजय मिळवला. त्यानंतर काँग्रेसच्याच शंकरराव माने यांनी 1967 च्या निवडणुकीमध्ये विजय संपादन करुन काँग्रेस पक्षाचा दबदबा कायम ठेवला. 1971 काँग्रेसच्या तिकिटावर राजाराम निंबाळकर विजयी झाले. पण त्यानंतरची 1977 च्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या दाजीबा देसाई यांनी काँग्रेसच्या ताब्यातुन हा मतदारसंघ काढुन घेतला. त्यानंतर 1980 ते 1996 दरम्यान सलग पाच वेळा झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड यांनी आपला दबदबा ठेवुन या मतदारसंघाचं नेतृत्व केलं...1998 च्या निवडणुकीत काँग्रेसकडुन खासदार सदाशिवराव मंडलीक पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. 1999 ला त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबत काँग्रेसशी काडीमोड घेतला आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर 1999 आणि 2004 मध्ये ते निवडुन आले. त्यानंतरच ख-या अर्थाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जाऊ लागला..... पण शरद पवार यांच्याशीही त्यांचे फाटले. 2009 ची निवडणुक त्यांनी अपक्ष म्हणून नुसती लढवली नाही, तर ती जिंकून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सर केला.
कोल्हापूर मतदारसंघातील विधानसभा क्षेत्राचं संख्याबळ पाहिल्यास राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे.
कागलमधुन कामगारमंत्री हसन मुश्रीफ, राधानगरीमधुन के. पी. पाटील आणि चंदगडमधुन संध्यादेवी कुपेकर हे राष्ट्रवादीचे तीन आमदार निवडुन आलेत. कोल्हापूर उत्तरमधुन राजेश क्षीरसागर, करवीर विधानसभा मतदारसंघातुन चंद्रदिप नरके हे शिवसेनेचे दोन आमदार आहेत तर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातुन सतेज पाटील हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत.
विधानसभेचं संख्याबळ पाहिल्यास कोल्हापुरात राष्ट्रवादीची ताकद आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळतं. अपक्ष खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं काँग्रेसची ताकद आणखी वाढलंय, एवढं नक्की....