www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई आणि पुण्यात गणरायाच्या विसर्जनाचा दरवर्षीप्रमाणे यंदाही अभूतपूर्व उत्साह होता. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई आणि पुण्याचे रस्ते गणेशभक्तांनी फुलले होते. मुंबईत लालबागचा राजा आणि पुण्यात दगडूशेठ गणपतीचं विसर्जन करण्यात आलंय.
मुंबईतल्या सार्वजनिक मंडळांनी मोठ्या थाटात आपल्या बाप्पांची मिरवणूक काढली. मानाच्या सर्वच गणपतींना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. तर मुंबई, पुण्यात इतर सार्वजनिक मंडळं अजूनही ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देत आहेत. लालबागच्या राज्याचं रात्री उशीरा खोल समुद्रात विसर्जन करण्यात आलं. सकाळी सुरू झालेली लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात दिवसभऱ सुरू होती. विसर्जन मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी लालबागच्या या ला़डक्या राजावर भाविकांनी पुष्पवृष्टी केली. गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला, पुढल्या वर्षी लवकर या असा जयघोष राजाच्या भक्तांनी चालवला होता.
पुण्यात बाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजानंही जोरदार हजेरी लावली होती. वरुणराजा प्रसन्न झाल्यानं बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी झालेले गणेशभक्त ओलेचिंब झाले होते. मात्र ढोलताशांच्या गजरात तल्लीन झालेल्या गणेशभक्तांनी पावसात भिजण्याचा दुहेरी आनंद घेतला. पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषानं सारी पुण्यनगरी दुमदुमली होती. प्रत्येक मंडळांनं आपलं वेगळेपण अबाधित ठेवत आपल्या बाप्पांना मोठ्या थाटात निरोप दिला. पुण्याचा आणि अवघ्या महाराष्ट्राचा लाडका असलेला दगडूशेठ हलवाई गणपतीचीही मोठ्या थाटात मिरवणूक काढण्यात आली. गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दगडूशेठ गणपतीचं विसर्जन झालं. अनेक वर्षानंतर तीन तास आधी दगडूशेठ गणपतीचं विसर्जन झालंय.
गेल्या दहा दिवसांपासून मुक्कामाला आलेले गणपतीबाप्पा आता पुन्हा आपल्या गावाला गेले. ढोलताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी लाखो मुंबईकर रस्त्यांवर उतरले होते.गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. अशा घोषणांचा सूर टिपेला भिडला होता. लालबागच्या सुप्रसिद्ध गणेशगल्ली गणपतीच्या मिरवणुकीला सकाळी सव्वा आठ वाजताच सुरूवात झाली. त्यानंतर लालबागचा राजा मंडळाच्या गणपतीची स्वारी विसर्जनासाठी निघाली.
विसर्जनाचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी रस्त्यारस्त्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे माशांचा धोका लक्षात घेऊन खबरदारीच्या उपाययोजना आखण्यात आल्या होत्या. रात्री नऊच्या सुमारास गणेशगल्लीच्या गणपतीचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले. त्याशिवाय हजारो लहानमोठ्या गणपतींचेही विविध चौपाट्यांवर विसर्जन झाले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्तीत तल्लीन झालेल्या भाविकांचे डोळे लाडक्या बाप्पाला निरोप देताना पाणावले होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.