स्पॉट फिक्सिंग : रवी शास्त्री चौकशी समितीचे अध्यक्ष?

चेन्नई सुपर किंग्जचा मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुनाथ मयप्पन याचा या फिक्सिंगमधील सहभागाची चौकशी करण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून (बीसीसीआय) तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 28, 2013, 03:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल)चं स्पॉट फिक्सिंग प्रकरण समोर आल्यानं अनेक जणांना चांगलाच हादरा बसला. चेन्नई सुपर किंग्जचा मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुनाथ मयप्पन याचा या फिक्सिंगमधील सहभागाची चौकशी करण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून (बीसीसीआय) तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रवी शास्त्री हे या समितीचे अध्यक्ष असतील.
तीन सदस्यीय चौकशी समितीत भारताचा माजी कॅप्टन रवी शास्त्री तसंच बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अजय शिर्के यांचा समावेश असू शकतो. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार या चौकशी समितीतील तिसरा सदस्य हा एखादा सेवानिवृत्त न्यायाधीश असू शकतो. तसंच बीसीसीआयचे वरिष्ठ उपाध्यक्ष अरुण जेटली, आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला तसंच बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांचाही या समितीत सहभाग असू शकतो.

बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी रविवारी चौकशी समिती स्थापन करण्याची आणि निष्पक्ष चौकशी करण्याची घोषणा केली. आपल्या जावयाची चौकशी करण्याचा प्रसंग ओढावला असला तरी श्रीनिवास यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा या समितीच्या कार्यप्रणालीत काहीही हस्तक्षेप असणार नाही. श्रीनिवासन यांचा जावई असलेल्या मयप्पनला आयपीएल फिक्सिंगमध्ये सहभाग असल्याच्या कारणावरून मुंबई पोलिसांनी अटक केलीय.