काकांचीही टगेगिरी.... पवारांचा संयम ढळला

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही टगेगिरीचा नमुना दाखवून दिला आहे. कधीही आपला संयम ढळू न देणारे शरद पवार यांचा काल मात्र तोल गेलाच...

Updated: Nov 13, 2012, 04:02 PM IST

www.24taas.com, बारामती
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही टगेगिरीचा नमुना दाखवून दिला आहे. कधीही आपला संयम ढळू न देणारे शरद पवार यांचा काल मात्र तोल गेलाच... बारामतीत बोलताना शरद पवार यांनी राजू शेट्टीवर शरसंधान साधत अरे तुरेच्या भाषेत राजू शेट्टींना सुनावले.
"तुझ्या मतदारसंघाचा कारखाना फुल्ल कपॅसिटीने चालतो. इथं मात्र ठिय्या मांडतो. तुला जर याचं एवढं कौतुक असेल, तर तुझं पहिलं दुकान बंद कर ना. दुसऱ्याचं दुकान बंद करायला का येतो?" अशा शब्दात शरद पवार यांनी राजू शेट्टीवर टीका केली आहे. शरद पवार यांनी आज राजू शेट्टी यांना उद्देशूनथेट अरे- तुरेची भाषा वापरली. याशिवाय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली.
आमच्या पार्लमेंटमध्ये राजू शेट्टी नावाचे खासदार आहेत. ज्यावेळी काम असतं, त्यावेळी ते माझ्याकडं येत असतात. अडचण आली की त्यांना माझ्याशिवाय कुणीही दिसत नाही. आणि मला आनंद आहे, शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न कुणी आणला तर तो माझा विरोधक आहे, की बाजूचा हे मी कधी बघत नाही.
आता त्यांनी आंदोलन केलं कुठं? इंदापूर तालुक्यात. त्यांचा मतदारसंघ कुठला? इचलकरंजी. त्यांच्या मतदारसंघात कारखाने कोणते? वारणा साखर कारखाना, जवाहर साखर कारखाना, आव्हाडे साहेबांचा कारखाना, तिसरा सा. रे. पाटलांचा.
वारणा साखर कारखाना फुल्ल कपॅसिटीने चालतो. मतदारसंघ कुणाचा शेट्टी साहेबांचा. तुझ्या मतदारसंघाचा कारखाना फुल्ल कपॅसिटीनं चालतो. इथं मात्र ठिय्या मांडतो. तुला जर याचं एवढं कौतुक असेल, तर तुझं दुकान पहिलं बंद कर ना. दुसऱ्याचं दुकान बंद करायला का येतो? आणि त्याच्यामध्ये साधी गोष्ट नाही.
मी सामाजिकदृष्ट्या काही बोलत नाही, पण ते कोणत्या समाजाचे आहेत आणि वारणाचे सभासद कोणत्या समाजाचे आहेत, ते तुम्ही बघा आणि ते बघितल्यानंतर त्या समाजाच्या कारखान्याला हात लावायचा नाही आणि दुसऱ्याच्या जिल्ह्यात जाऊन इतरांचे कारखाने बंद पाडायचे हे योग्य आहे का?
याचा विचार तुम्ही केला पाहिजे आणि म्हणून माझं आग्रहाचं सांगणं हे आहे की, तुम्हाला जर शेतकऱ्यांचा कळवळा असेल, तर स्वत:च्या घराच्या भोवतीचा कारखाना पहिल्यांदा बंद करा आणि नंतर दुसऱ्याच्या दारात तुम्ही जा. पण तुम्ही स्वत:चं दुकान चालू ठेवणार आणि बाकीच्याचं बंद करून चालणार नाही. याचा अर्थ तुमचं वागणं कितपत बरोबर आहे. याचा विचार लोकांना आता समजायला लागला आहे.