www.24taas.com,पुणे
ऊसाला ३००० रूपये दर देण्यासाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. आंदोलन करणाऱ्यांनी जाळपोळ आणि तोडफोड केल्याने पोलिसांनी गोळीबार केला. त्यातच ऊसदरासाठी आंदोलन सुरु करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, सतीश काकडे यांच्यासह इतर सहा जणांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यामुळे त्यांची दिवाळी जेलमध्ये साजरी होत आहे.
चक्काजाम आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी राजू शेट्टींसह इतरांना ताब्यात घेतलं. मात्र त्यांनी जामीन नाकारल्याने सर्वांची रवानगी येरवडा तुरुंगात करण्यात आली आहे. आंदोलनात दोघांचे बळी गेल्याने कार्यकर्त्यांनी शांततेत आंदोलन करावं. कोणताही हिंसक प्रकार करु नये. आम्ही शेतकऱ्यांसाठी तुरुंगातही आंदोलन करायला तयार आहोत, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
सावतामाळी येथे ठेवण्यात आलेल्या एकशे अकरा कार्यकर्त्यांना त्यांच्या संबंधित ठिकाणी सोडण्यात आलं आहे. ऊसदरासाठी सुरु केलेल्या आंदोलनाला पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी हिंसक वळण लागलं. पोलिसांच्या गोळीबारात एकाचा तर पेटवापेटवी करताना एका आंदोलकाचा मृत्यू झाला. ऊसदराच्या या आंदोलनाने दोन शेतकऱ्यांचा बळी घेतला.