दुष्काळग्रस्त गावात आनंदाचे झरे!

मावळच्या कुशीत वडेश्वरच्या डोंगरावर विसावलेली सटवाईवाडी. पावसाळ्याचे दिवस वगळता आठही महिने पाचवीला पुजलेली पाणीटंचाई... पण आज या गावचं चित्र पालटलय. टाटा मोटर्सच्या सुमंत मुळगावकर फौंडेशनने वर्षभरापूर्वी एका जिवंत झ-याचा आधार घेत तळे खोदायला सुरुवात केली. गावक-यांनीही श्रमदान केले. अन् बघता बघता तळे उभे राहिले…

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 4, 2013, 10:53 AM IST

www.24taas.com, पुणे
मावळच्या कुशीत वडेश्वरच्या डोंगरावर विसावलेली सटवाईवाडी. पावसाळ्याचे दिवस वगळता आठही महिने पाचवीला पुजलेली पाणीटंचाई... पण आज या गावचं चित्र पालटलय. टाटा मोटर्सच्या सुमंत मुळगावकर फौंडेशनने वर्षभरापूर्वी एका जिवंत झ-याचा आधार घेत तळे खोदायला सुरुवात केली. गावक-यांनीही श्रमदान केले. अन् बघता बघता तळे उभे राहिले…

राज्यात आज अनेक गाव दुष्काळाने होरपळून निघाले आहेत. पिंपरी चिंचवड जवळ मावळ परिसरातही अनेक गाव अशीच पाण्याविना आहेत. त्यातलच एक गाव म्हणजे मावळच्या कुशीत वडेश्वरच्या डोंगरावर विसावलेली सटवाईवाडी…पावसाळा वगळता इथे कायम पाण्यासाठी वण वण होती. ती आता थांबली आहे.

टाटा मोटर्स कंपनीच्या सुमंत मुळगावकर फौंडेशनतर्फे आदिवासी तसेच दुर्गम भागातील नागरिकांसाठी विविध सामाजिक प्रकल्प उभारले जातात. या अंतर्गत अनेक दुष्काळग्रस्त भागांची तहान भागविण्याचे कामही केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून सटवाईवाडी या डोंगरकपा-यांमधील गावासाठी फौंडेशनने तळं उभारलं.
पाण्याची कायमस्वरुपी सोय झाल्याने भारावलेल्या सटवाईवाडी ग्रामस्थांनी लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या टाटा मोटर्सच्या अधिका-यांचे ढोल-ताशांच्या गजरामध्ये जंगी स्वागत केले. चक्क अधिका-यांच्या पायावर पाणी ओतून औक्षण करण्यात आले. बैलगाडीतून अधिका-यांची वाडीतून मिरवणूक काढली. गुलालाची उधळण करण्यात आली. महिलांच्या चेह-यावर पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट संपल्याचा आनंद ओसांडून वाहत होता.

महाराष्ट्रातील अनेक गावे आज दुष्काळाने होरपळत असताना सटवाईवाडीत आनंदाचे झरे वाहत आहेत. दुष्काळाचा मुकाबला करण्या साठी आज अनेकांनी पुढ येण्याची गरज आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या सुमंत मुळगावकर फौंडेशनने ती गरज ओळखलीय. हीच गरज इतरांनी ओळखली तर दुष्काळान होरपळलेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळेल.