ww.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईमध्ये रात्री धूम स्टाईल रंगणा-या स्टंट रेसिंगला आळा घालण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. वाहतूक पोलिसांनी मुंबईतल्या तब्बल साडेचार लाखांपेक्षा जास्त बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाई करून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. या कारवाईतून ४ कोटींचा दंडही वसूल करण्यात आलाय. यापुढे धूम स्टाईल बाईक चालवणा-यांविरोधात आणखी कडक कारवाई केली जाणार आहे.
एकीकडे मुंबईतील रस्ते काहीसे सुनसान झाले की धूम स्टाईल रेसिंग लावणाऱ्यांचं साम्राज्य मुंबईतील काही रस्त्यांवर असायचं. मरीन ड्राईव्ह, वरळी सीफेस, बॅण्ड स्टॅण्ड, कार्टर रोड, पश्चिम आणि पूर्व द्रूतगती महामार्ग या रस्त्यांवर वाऱ्याशी स्पर्धा करत बाईकची रेसिंग लावली जायची. या जीवघेण्या स्टंटबाजीत काहींना आपला जीवही गमवावा लागला तर इतर वाहनांनाही अपघात झाले होते. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलीसांनी या स्टंटबाजांविरोधात धडक कारवाई सुरू केली.
मागील आठ महिन्यात वाहतूक पोलिसांनी मुंबईत साडेचार लाख बाईकस्वारांवर कारवाई केली आहे. यातून चार कोटींचा दंडही वसूल करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने धूम स्टाईल बाईक चालवणाऱ्यांबरोबरच मद्य प्राशन करून बाईक चालवणारे, वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या बाईकस्वारांचाही समावेश आहे.
यापुढे धूम स्टाईल बाईकर्सना पूर्णपणे आळा घालण्यासाठी त्यांच्याविरोधात कलम २७९ अंतर्गत कारवाई करण्याचा गृहखात्याचा विचार आहे. बेशिस्त बाईक चालवणारे बाईकस्वार स्वतःचा जीव धोक्यात घालतातच याशिवाय त्यांच्यामुळे इतरांचाही जीव धोक्यात असतो. त्यामुळे पोलीसांनी याप्रकरणी गांभीर्याने कारवाई सुरू केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ