www.24taas.com, गोंदिया
पारंपरिक ऊस लागवडीच्या पद्धतीला फाटा देणारा एक अभिनव प्रयोग गोंदिया जिल्ह्यातील शेकऱ्यानं केलाय. या प्रयोगामुळे त्यांचं साधारण ७० ते ७५ टक्क्यांनी उसाच्या उत्पादनात वाढ होणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी डॉक्टर दिलीप कापगते यांच्या कडे एकूण १० एकर शेती आहे. मात्र त्यांनी ७ एकरावर उसाची लागवड केली. ती ही अभिनव पद्धतीनं. पारंपारिक उसाच्या लागवडीत उसांच्या मध्ये ४ फुटांचे अंतर ठेवले जाते. मात्र यांनी उसामध्ये ८ फुटांचे अंतर ठेऊन या अंतरावर उसाची लागवड केली आहे. या पद्धती मुळे त्यांना उसावर पडणाऱ्या रोगाबद्दल माहिती तर मिळतेच सोबतच ट्रक्टरही या दोन ओळींच्या मध्ये घेऊन जाऊ शकतो.
कापगते यांच्या शेतातील उस हा दहा ते १२ फुट उंच झाला आहे. जास्त उंच उसांना वाऱ्याने पडण्याची भीती असते. मात्र कापगते यांनी यावरही उपाय शोधून कढला. त्यांनी ८ ते १० उसाच्या कांड्यांना दोरीनी बांधून ती दोरी जमिनीत रोवली आहे...या मुळे कितीही वारा आला तरी उस पडणार नाही आणि त्यांचं नुकसान होणार नाही. त्यांनी मागील हंगामात एकरी 40 टन उसाचे उत्पादन घेतले होते मात्र यंदा तेच उत्पादन हे या प्रयोगामुळे एकरी ७० ते ७५ टनांनी वाढेल अशी त्यांनी अशा व्यक्त केली आहे.
कापगते यांनी आपल्या या प्रयोगात अभ्यास करिता ५ वाणांची लागवड केली आहे. यात २६५,६७१,८६०२,९८०५,४१९ हे वाण आहेत. कापगते यांनी उसाला पाण्याकरिता ठिबक सिंचनाची सोय केली आहे. उसाच्या दोन ओळी मधून या पाण्याची व्यवस्था केल्या मुळे पाण्याची ही मोठी बचत होते शिवाय प्रत्येक उसाच्या खंडावर लक्ष हि केंद्रीत करता येते. कापगते यांचा हा अभिनव प्रयोग शेतकऱ्यांना नवीन दिशा देणारा आहे.