www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सागरी सुरक्षेसाठी मुंबई पोलीस आणि यंत्रणा सज्ज असल्याचा दावा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलाय. परंतु हा दावा अगदीच फोल आहे. सागरी आयुक्तालय तर लांबच राहिलं, मुंबईत चार ठिकाणी जेट्टी बांधण्याचा प्रकल्प देखील अद्याप लालफितीच्या कारभारात अडकून पडलाय.
मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षा मजबूत व्हावी यादृष्टीने अद्ययावत बोटी, स्पीड बोटी आणि शस्त्र खरेदी करण्यात आली. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे पोलिसांच्या बोटी सध्या वा-यावरच आहेत. पाण्यामध्ये सुरक्षित ठिकाणी त्या पार्क करता याव्यात, भुरट्या चोरांपासून त्यांचे रक्षण व्हावे आणि मुंबई पोलिसांच्या स्वतःच्या जेट्टी असाव्यात, यासाठी तयार करण्यात आलेला 27 कोटी रुपयांचा जेट्टी प्रकल्प सध्या रखडलाय. दस्तुरखुद्द आबांनीच त्याची कबुली दिलीय.
मढ, वांद्रे, कफ परेड आणि गीतानगर ससून डॉक या ४ ठिकाणी जेट्टी बांधण्याचा हा २७ कोटी रूपयांचा प्रकल्प आहे. यापैकी सागरी सुरक्षा चौकीसाठीच्या दोन जागा मच्छिमारांनी हडपल्या आहेत. एका सागरी चौकासाठी जागाच निश्चित होत नाहीये. तर, एका चौकाच्या जागेसाठी पर्यावरण आणि संबंधित खात्याकडून परवानगी मिळत नाहीये.
सागरी सुरक्षेच्या कोणते ही काम लालफितीत अडकणार नाही, वेळ पडल्यास याकामासाठी कठोर भूमीका घेतली जाईल अशी घोषणा गृहमंत्र्यांनी केली होती. सध्या सागरी सुरक्षेचे रखडलेले प्रकल्प आणि राजकीय उदासिनता लक्षात घेता गृहमंत्र्यांची ही घोषणा घोषणाच राहिल असं दिसतय.
सागरी सुरक्षेसाठी पोलीसांच्या ताफ्यात दाखल झालेल्या या बोटी खराब निघाल्या... या बोटी चालवणा-या प्रशिक्षित कर्मचा-यांचा अभाव जाणवतोय. इंधनाचा तुटवडा आहे. बॉम्ब स्कॅनर व्हॅनचा स्कॅनर खराब असल्यानं ती व्हॅन गेली तीन वर्षे पडून आहे. एवढी बोंब असतानाही दहशतवाद्यांचा बाप आला तरी आता मुंबईवर हल्ला करू शकणार नाही, असं आबा बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आहेत. "बडे बडे देशो में ऐसी छोटी छोटी बाते होती रेहती है" असं म्हणणारे आबा 26/11 पासून काहीच धडा शिकले नाहीत का..? अन्यथा सागरी सुरक्षेच्या मुद्यावरून त्यांनी अशी तोंडपाटीलकी केलीच नसती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ