उठा, राष्ट्रवीर हो!... भारतीय संरक्षण दलाची साद

एकीकडं देश १९७१ च्या शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी विजय दिवस साजरा करतोय तर दुसरीकडं देशाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या सैन्यदल, नौदल आणि हवाई दलाला प्रतिक्षा आहे सक्षम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 14, 2012, 11:00 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
देशाची सेना… ज्या सेनेमुळं तुम्ही-आम्ही निर्धास्तपणे अंथरुणाला पाठ टेकू शकतो, ते भारतीय संरक्षणदल... १९७१ च्या भारत-पाक युद्धातल्या विजयाची आठवण म्हणून १५ डिसेंबर आणि १६ डिसेंबर रोजी आपण विजय दिवस साजरा करत आहोत. मात्र, त्याच वेळी एक गंभीर वस्तुस्थितीनं सैन्यदलांना घेरलंय. भारतीय लष्करात सुमारे १३ हजार अधिकारी आणि ५५ हजार जवानांची कमतरता आहे. संरक्षणमंत्र्यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही गंभीर परिस्थिती समोर आलीय.
एकीकडं देश १९७१ च्या शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी विजय दिवस साजरा करतोय तर दुसरीकडं देशाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या सैन्यदल, नौदल आणि हवाई दलाला प्रतिक्षा आहे सक्षम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची. संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी ११ डिसेंबर २०१२ ला लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार भारतीय लष्करात १३ हजार अधिकारी आणि ५३ हजार ७०० जवानांची कमतरता आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार झाल्यामुळं उपलब्ध झालेले नोकरीचे इतर पर्याय, लष्कराची कठोर निवड प्रक्रिया, मोठ्या प्रमाणातील जोखीम आणि लष्करी नोकरीतील बिकट परिस्थिती या कारणामुळं ही पदं रिक्त असल्याचं अँटनी यांनी म्हटलंय. या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारीदेखील सैन्यात येण्याचं आवाहन तरुणांना करतायत.
सैन्यदल, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांमध्ये रिक्त जागांचं प्रमाण लक्षणीय आहे. लष्करात जुलै अखेर १०१०० अधिकारी आणि ३२,४३१ कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत. नौदलात सप्टेंबर अखेर १९९६ अधिकारी आणि १४,३१० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे तर हवाई दलात डिसेंबर अखेर ९६२ अधिकारी आणि ७००० कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर तिन्ही संरक्षण दलांना सक्षम करण्यासाठी संरक्षण दलातल्या नोकरीबाबत तरुणांच्या मनात निर्माण झालेले गैरसमज दूर करण्याची गरज निवृत्त अधिकारी व्यक्त करत आहेत.