www.24taas.com, रायपूर
जनतेकडून टॅक्समार्फत गोळा केल्या जाणाऱ्या पैशाचा कसा विनियोग केला जाऊ शकतो, याचं छत्तीसगड सरकारनं एक आगळावेगळा नमूना दाखवून दिलाय. छत्तीसगडच्या रमनसिंह सरकारनं राज्य स्थापना दिवसाच्या कार्यक्रमासाठी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरच्या फक्त आठ मिनिटांच्या परफॉर्मन्साठी दीड करोड रुपये बिदागी दिलीय. आणि मुख्य म्हणजे कोणताही खेद न बाळगता गुरुवारी सरकारचे मंत्री ब्रजमोहन अग्रवाल यांनी स्वत: ही माहिती दिलीय.
राज्य स्थापना दिवसाच्या निमित्तानं छत्तीसगडमध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नव्या रायपूरात १ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात करीनाचा एक परफॉर्मन्सदेखील आयोजित करण्यात आला होता. यावेळी करीनानं केवळ आठ मिनिटांच्या परफॉर्मन्सनं प्रेक्षकांना खूश केलं. या परफॉर्मन्ससाठी तिला तब्बल १ करोड तब्बल १ करोड ४० लाख ७१ हजार रुपये मानधन म्हणून दिलं गेलं.
काँग्रेस नेते मोहम्मद अकबर यांनी राज्य स्थापना दिवसानिमित्त केल्या गेलेल्या खर्चाबद्दल माहिती मागविली होती. सार्वजनिक निर्माण मंत्री ब्रजमोहन अग्रवाल यांनी लेखी दिलेल्या माहितीत, ‘या कार्यक्रमासाठी एकुण २४५ कलाकारांनी सहभाग घेतला होता तसंच १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमामध्ये या कलाकारांवर तब्बल ५ करोड २१ लाख २२ हजार ५०० रुपये खर्च झाल्याची’ माहिती दिलीय.
करीनाशिवाय, गायक सोनू निगम याला ३६ लाख ५० हजार, गायिका सुनिधी चौहान हिला ३२ लाख, अभिनेत्री दिया मिर्झा हिला २२ लाख, गायक हिमेश रेशमिया २४ लाख तर गझल गायक पंकज उधास यांना ९० हजार रुपये मानधन म्हणून दिल्याची माहिती दिली गेलीय.