EXCLUSIVE- मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र की पशूकेंद्र?

मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना ठाण्यात पहायला मिळतोय. मोठा गाजावाजा करून ठाण्यात विद्यापीठाच्या उपकेंद्राचं भूमिपूजन केलं खरं, पण आता या उपकेंद्राचं पशूकेंद्र बनलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 29, 2013, 10:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना ठाण्यात पहायला मिळतोय. मोठा गाजावाजा करून ठाण्यात विद्यापीठाच्या उपकेंद्राचं भूमिपूजन केलं खरं, पण आता या उपकेंद्राचं पशूकेंद्र बनलंय. हे केंद्र म्हणजे अनैतिक धंद्यांचा अड्डा बनलाय. मुंबई विद्यापीठाच्या अजब कारभाराचा झी 24 तासनं केला पर्दाफाश.
मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात खरं तर विद्यार्थी दिसायला हवे, पण इथं प्रवेशद्वारावर तुमचं स्वागत करायला चक्क गाढवं असतात. थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला म्हशी भेटतात. या जागेवर अनधिकृतपणे गोठाही बांधला गेलाय. सध्या उन्हाळा असल्यानं म्हशींना डुंबण्यासाठी छोटा तलावही आहे. इतकं कमी की काय म्हणून डुकरांचाही इथे वावर असतो. त्यामुळे हे मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र आहे की पशुकेंद्र असा प्रश्न नक्कीच पडतो. फक्त पशुकेंद्रच नाही तर या जागेवर अतिक्रमणंही आहेत. विद्यापीठाची जागा असल्यानं इथं शिकण्यासाठी इथं विद्यार्थ्यांची गर्दी असायला हवी होती. मात्र इथे रंगतो पत्त्यांचा जुगार, झोडल्या जातात दारुच्या पार्ट्या. ही अतिक्रमणं, अनैतिक धंदे रोखण्यासाठी सुरक्षा चौकी बांधलीय, पण हे सगळं चित्र पाहिलं की या जागेचा उपयोग विद्यापीठानं कसा केलाय हे वेगळं सांगायला नको.
विद्यापीठानं ही जागा कधी मिळवली ? इतक्या वर्षांत त्यांनी उपकेंद्र उभारणीसाठी काय केलं ? 2007 साली ठाणे महापालिकेकडून मुंबई विद्यापीठाला जागा मिळाली. त्यानंतर भूमिपूजनाचा नारळ फोडण्यासाठी 2011 साल उजाडलं. ऑगस्ट 2011 ला भूमिपूजन झाल्यानंतर इथं संरक्षक भिंतीशिवाय कुठलंही काम झालेलं नाही. उपकेंद्र उभारणीसाठी सुरुवातीला विद्यापीठानं अर्थसंकल्पात तीन कोटींची तरतूद केली. त्यानंतर गेल्या काही वर्षांत त्यात वाढ करून पाच कोटी आणि आता सहा कोंटीवर तरतूद नेली. पण उपकेंद्राच्या उभारणीची कार्यवाही शून्य. या सगळ्याबाबत विधिमंडळातही प्रश्न उपस्थित केला गेला. पण तिथंही आकडेवारीत बनवाबनवीच दिसली. 2012 च्या विधिमंडळ अधिवेशनात उपकेद्राबाबत विचारणा झाल्यानंतर 60 टक्के काम झाल्याचा दावा केला गेला. आणि 2013 च्या अधिवेशनात 40 टक्के काम झाल्याचं सांगितलं. वर्षभरात काम वाढण्याऐवजी कमी कसं झालं हे माहिती देणा-या विद्यापीठालाच माहीत. सुरुवातीपासून शिवसेना या उपकेंद्राबाबत पाठपुरावा करतेय, पण पदरी काहीही पडत नसल्यानं आता कोर्टात दाद मागण्याचा निर्णय पक्षानं घेतलाय.
तीन हेक्टर जागेवर मुंबई विद्यापीठानं सध्या फक्त दोन प्रशासकीय कार्यालयाच्या टप-या उभारल्यात. या कार्यालयात टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर आहेत. पण हे सगळं साहित्य धूळ खात पडलंय. इथं विद्येची देवता सरस्वतीचं चित्र आपल्याला आवर्जून दिसतं. पण ठाण्यातल्या विद्यार्थ्यांना ख-या अर्थानं इथं विद्यार्जन कधी करता येईल, याचं उत्तर मुंबई विद्यापीठच देऊ शकतं. पण विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे तशी इच्छाशक्ती आहे काय? भोंगळ कारभाराची ही लक्तरं वेशीवर टांगल्यानंतर तरी कुलगुरू या उपकेंद्राकडे लक्ष देतील काय ?

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.