लाचखोर पोलीस!

मुंबईच्या कुर्ला परिसरात राहणा-या कासीम खान यांच्या मित्राचं नेहरुनगर परिसरात रेफ्यूजी कॅम्पमध्ये घर आहे..त्यांना आपल्या घराची उंची वाढवायची होती.. त्यासाठी पोलिसांनी आपल्याकडं लाच मागितल्याचा आणि त्यांची लाचखोरी छुप्या कॅमे-यात कैद केल्याचा दावा कासिम खान यांनी केलाय....

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 12, 2013, 07:11 AM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईच्या कुर्ला परिसरात राहणा-या कासीम खान यांच्या मित्राचं नेहरुनगर परिसरात रेफ्यूजी कॅम्पमध्ये घर आहे..त्यांना आपल्या घराची उंची वाढवायची होती.. त्यासाठी पोलिसांनी आपल्याकडं लाच मागितल्याचा आणि त्यांची लाचखोरी छुप्या कॅमे-यात कैद केल्याचा दावा कासिम खान यांनी केलाय....

अनधिकृत बांधकामासाठी पोलीस खुलेआमपणे लाच घेत असल्याचं आताच आपण बघितलंय..पोलिसांची लाचखोरी उघड झाल्यानंतर गृहखात्याने ३६ पोलिसांनी निलंबित केलंय...पण याप्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी अजब तर्क लढवलाय. पोलिसांना लाच घेण्यास प्रवृत्त केल्याचा दावा सत्यपाल सिंग यांनी केलाय.... यामुळे आयुक्तांनी या लाचखोरीचं अप्रत्यक्षरित्या समर्थनच केल्याचं मानलं जातंय.
कुर्ला-नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या 36 कर्मचा-यांना एका फटक्यात निलंबित करण्यात आल्यानं अनधिकृत बांधकामांच्या अभद्र युतीमध्ये खाकीही मागे नसल्याचं स्पष्ट झालंय... कासम खान आणि रिझवान खान यांनी स्टिंग ऑपरेशन करून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या लाचखोरीचा पर्दाफाश केला....
कुर्ल्यात 66 वर्ष जुना ठक्करबाप्पा रेफ्युजी कॅम्प आहे. कुर्ला-नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या या वसाहतीत प्रकाश नवल यांचीही जागा आहे. त्यांना या जागेचं नुतनीकरण करायचं होतं. त्यासाठी कुर्ला-नेहरूनगर ठाण्याच्या पोलिसांनी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आलाय. नवल यांचे मित्र कासम खान यांनी चक्क या लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशनच केलं आणि झोन पाचचं डीसीपी कार्यालय आणि आयुक्त सत्यपाल सिंग यांच्याकडे तक्रार केली आणि स्टिंग ऑपरेशनची डीव्हीडीदेखील सोपवली. पोलीस ठाण्यातल्या सर्व पोलिसांनी मिळून 45 हजार रुपयांची लाच घेतल्याचा आरोप खान यांनी केलाय. अशाच प्रकारे वसाहतीतल्या सर्वांकडून अनधिकृत बांधकामासाठी वर्षानुवर्षं पोलिसांना लाच दिली जात असल्याचाही आरोप त्यांनी केलाय...
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आयुक्त सत्यपाल सिंग यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. पोलिसांना लाच घ्यायला भाग पाडून त्याचं स्टिंग ऑपरेशन केलं, असा अजब तर्क सिंग यांनी लढवलाय.
सिंग यांचा हा दावा कासम खान यांनी फेटाळून लावलाय. मुंबई पोलिसांवर आपला विश्वास नसून त्यांच्याकडूनच आपल्या जीवाला धोका असल्याची भिती त्यांनी व्यक्त केलीय. याप्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय.

बिल्डर-राजकारणी आणि नोकरशहा यांच्या अभद्र युतीमुळे सर्वच शहरांत अनधिकृत बांधकामं फोफावली आहेत... या प्रकरणामुळे पोलिसांनीही हातमिळवणी केली असून याला आता महायुतीचं स्वरूप आलंय. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे पोलीस आयुक्तांनीच थेट लाचखोरांची तळी उचलल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.