www.24taas.com, मुंबई
स्त्रीभ्रूणहत्ये विरोधात सरकारी पातळीवर तसेच स्वयंसेवी संस्थांनी कंबर कसल्यामुळे गर्भलिंग चाचण्यांवर ब-याच प्रमाणात लगाम लागला आहे आणि त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.स्त्रीभ्रूणहत्येसाठी बदनाम झालेल्या बीड जिल्ह्यातही आता मुलींचा जन्मदर वाढलाय.
मुलींच्या जन्माविषयी राज्यभर जनजागृती सुरु असून त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये मुलींच्या जन्मदराता वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. सरकारने कारवाईचा बडगा उगारल्यावर काय होवू शकतं याची प्रचीती यातून दिसून येत आहे. बीडमधील स्त्रीभ्रूणहत्याप्रकरण उघड झाल्यानंतर राज्य सरकारला जाग आली आणि त्यानंतर स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलली. चोरीछुपे गर्भलिंग चाचणी करणा-या सोनोग्राफी केंद्रांवर राज्यभर करवाई करण्यात आली. काही डॉक्टरांना अटकही करण्यात आली. एकीकडं राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारला असतांना दुसरीकडं काही स्वयंसेवी संस्थांनी स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी अभियान सुरु केलं. त्याचा दृश्य परिणाम आता दिसू लागला आहे. राजधानी मुंबईत मुलींचा जन्मदर वाढला आहे.
वर्ष २०११
मुले - ८७४०८
मुली- ८०१५५
---------
वर्ष २०१२
मुले - ९२९६०
मुली - ८५७२८
मुंबई महानगरपालिकेनंच्या आकडेवरीवरुन मुंबईत मुलींचा जन्मदर वाढल्याचं सहज लक्षात येईल .मुंबई प्रमाणेच राज्यातील काही जिल्ह्यातही अशाच प्रकारची आकडेवरी पहायला मिळतेय. स्त्रीभ्रूणहत्येसाठी बदनाम झालेल्या बीड जिल्ह्यातही आता चित्र बदलू लागलय. गेल्या दहा महिन्याच्या कलावधीत मुलींचा जन्मदर ८०१ वरुन ८९५वर जाऊन पोहोचला आहे. मुलींचा जन्मदर कमी असणा-या दहा जिल्ह्यात बीड जिल्हा वरच्या क्रमांकावर होता. सरकारची कारवाई आणि जनजागृतीमुळे परिस्थिती बदलू लागली आहे..बीड प्रमाणेच लातूर, नांदेड, उस्मानाबाद, यवतमाळ, वर्धा, भंडारा,गोंदिया, वाशीम सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव इथही परिणाम दिसू लागले आहेत. स्त्रीभ्रूणहत्येविरोधात सुरु असलेली ही मोहीम अशीच सुरु राहिल्यास भविष्यात चित्र आणखी बदलेलं दिसेल यात कोणालाच शंका नाही.