हरवलेलं बालपण

भारतात दर मिनिटाला दोन मुलं बेपत्ता होतात. अनेक मुलं गुलामगिरीच्या अजगरी विळख्यात अजूनही अडकलेली आहेत. मुलांवर होणाऱ्या अत्याचाराची लांबलचक यादी ही भीषण आहे.

Updated: Dec 20, 2011, 12:07 PM IST

झी २४ तास वेब टीम, बंगळुरू

 

मुलं ही देशाचं भविष्य आहेत. मात्र आपल्या भविष्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढण्याची आपली तयारी फार कमकुवत आहे. कारण दर मिनिटाला इथं दोन मुलं बेपत्ता होतात. अनेक मुलं गुलामगिरीच्या अजगरी विळख्यात अजूनही अडकलेली आहेत. मुलांवर होणाऱ्या अत्याचाराची लांबलचक यादी ही भीषण आहे.

 

ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागणा-या तब्बल ३०० मुलांना बंगळूरू पोलिसांनी मोठ्या शिताफीने सोडवलंय आणि त्याना एक नवीन जीवनदान दिलंय.याच शहरामध्ये जवळपास ११०० पेक्षा जास्त मुलं ही भीक मागत आहेत आणि विशेष म्हणजे परराज्यातून मुलांचं अपहरण करुन माफियानी त्यांना या धंद्यात ढकललंय.

 

जगाच्या नकाशावर आपली एक वेगळी ओळख नेहमी कायम ठेवणाऱ्या बंगळूरु शहरात सध्या पोलीस एक अभियान राबवतायत.हे प्रकरण लहान मुलांशी संबंधित आहे आणि तेवढचं गंभीरही आहे. काही NGO च्या मदतीने बंगळुरु पोलीस त्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यांना बळजबरीने भीक मागण्यासाठी प्रवृत्त केलं जातंय.  मुलांचं  अपहरण करुन गुंड टोळ्यांना विकली जातात आणि त्या टोळ्या या मुलांकडून भीक मागण्याचा अभद्र धंदा करतात.तीन दिवसांत शहरातल्या विविध भागात कारवाई करुन तब्बल ३०० मुलांना वाचवण्यात आलंय.  यामध्ये ११० मुलं तर दोन वर्षांपेक्षाही कमी वयाची आहेत. भीक मागण्यास प्रवृत्त करणाऱ्या टोळ्या या मुलांना नेहमी नशेत ठेवतात आणि त्यामागचं कारणही तसंच आहे.  कारण ही मुलं नशेत राहून  कमकुवत दिसावीत आणि त्यांनी आपली ओळख कोणालाही पटवण्यात असमर्थ ठरावीत, असा त्यामागचा उद्देश्य असतो.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,एकट्य़ा बंगळूरू शहरात भीक मागण्यास बळजबरी करणाऱ्या मुलांची संख्या ११०० च्या वर आहे. ही वाढती आकडेवारी लक्षात घेता पोलिसांनी आता या टोळ्यांच्या मास्टरमाईंडवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

 

 

एका अहवालानुसार,देशात लहान मुलं बेपत्ता होण्याच्या जवळपास ६० हजार तक्रारी दाखल होतात.यापैकी काही मुलांना बळजबरीने भीक मागण्यास प्रवृत्त केलं जात तर काहींची परदेशात विक्री केली जाते.बंगळूरू पोलिसांच्या या मोहिमेनुसार,इतर राज्यातील बेपत्ता मुलांना एक आशेचा किरण नक्कीच दिसेल असा विश्वास व्यक्त केला जातोय.

 

[jwplayer mediaid="15696"]