www.24taas.com, अरूण मेहेत्रे, पुणे
पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी..... पुणेकरांवर सध्या पाण्याचं संकट कोसळलंय. त्याचवेळी पुण्याच्याच जलकेंद्रांतून लाखो लीटर पाणी वाया जातंय. दिवसाला दोन ते अडीच लाख पुणेकरांना पुरेल इतकं पाणी निव्वळ वाया जातंय.
पाण्याचा हा नैसर्गिक धबधबा नाही, किंवा हे एखादं जलकुंडही नाही.... या भल्यामोठ्या पाईपमधून पडणारं हे स्वच्छ आणि शुद्ध पाणी अक्षरशः गटारात सोडण्यात येतंय. पुण्याच्या पर्वती जलकेंद्रातून बाहेर पडणारं हे पाणी आहे. पुण्यातल्या पाणीगळतीचं विदारक सत्य दाखवणारं हे फक्त एक उदाहरण.... अशी पाणीगळती सर्रास पुण्यात सुरू आहे. ऐकून धक्का बसेल पण पर्वती जलकेंद्रातून अशा प्रकारे दररोज 50 ते 60 लाख लीटर्स पाण्याची गळती होते. महापालिका प्रशासन हे मान्य करतंय, पण कारवाईच्या नावानं बोंब आहे.
पुण्यात सध्या प्रचंड पाणीटंचाई आहे. शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा चक्क बंद करण्यात आलाय. अशा परिस्थितीत पुण्यात सुमारे दोन ते अडीच लाख लोकांना पुरेल इतकं पाणी रोज वाया जातंय.
पाणीगळतीचा हा प्रश्न वर्षांनुवर्ष जुना आहे. पाणी टंचाईच्या काळात या प्रश्नाची दाहकता जाणवते. दरवर्षीच्या उन्हाळ्यात हा प्रश्न चघळला जातो आणि पुढे काहीच होत नाही. महापालिकेच्या हलगर्जीपणाची शिक्षा समस्त पुणेकरांना भोगावी लागतेय. त्यामुळे आता महापालिकेला पुणेकरांनीच जाब विचारण्याची गरज आहे.