निवडणुकीची धुमशान

राज्यात नगरपालिका निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि विरोधकांनी मरगळ झटकली. कारण वाढती महागाई, अण्णा फॅक्टर यामुळे कॉंग्रेस आघाडी बॅकफूटवर जाणार अस वाटत होतं. पण आता निवडणूक निकालानंतर वेगळं चित्र समोर आलं.

Updated: Dec 15, 2011, 11:24 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

राज्यात नगरपालिका निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि विरोधकांनी मरगळ झटकली. कारण वाढती महागाई, अण्णा फॅक्टर यामुळे कॉंग्रेस आघाडी बॅकफूटवर जाणार अस वाटत होतं. पण आता निवडणूक निकालानंतर वेगळं चित्र समोर आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या यशाचा वारु चौफेर उधळला. त्या तुलनेत  काँग्रेससाठी निकाल म्हणजे धक्कादायक बनलेयत.

 

राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकींच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याचा गजर झालाय तसेच काँग्रेसच्या हातालाही  मतदारांनी चांगलीच साथ दिलीय. राज्यातील १९५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीत आपलं वर्चस्व राखाण्यासाठी राज्यातील सगळेच राजकीय पक्ष आणि नेते कामाला लागले होते. काही समोर सत्ता कायम राखण्याचं आव्हाण होतं तर काहींना सत्ता मिळविण्याचं आव्हान पेलायचं होतंच. या युद्धात काही पास तर काही नापास झाले आहेत.

 

खरंतर निवडणुकीच्या या रणसंग्रामात राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांपासून  उद्योग मंत्री नारायण राणेंपर्यंत आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांपासून ते भास्कर जाधवांपर्यंत सगळ्याच नेत्यांची एकप्रकारे परीक्षाच होती.

निवडणूक म्हटलं की आऱोप-प्रत्यारोपाची धुळवड उडणार हे ओघाने आलंच. या निवडणूकीत कोकणातलं धुमशान चांगलंच गाजलं. उद्योग मंत्री नारायण राणे आणि राज्यमंत्री भास्कर जाधव या दोन नेत्यांमध्ये वाक्युद्ध रंगलं होतं. पण निवडणुकांच्या  निकालानंतर मतदारांना गृहीत धरल्यानंतर काय होतं याची दिग्गजांना प्रचिती आली. या निवडणुकीत 'मी....मी' म्हणणाऱ्यांना मतदरांनी अक्षश: लोळवल्याचं पहायला मिळालं.

 

दिल्लीच्या राजकारणाची सवय असलेले राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पदरीही अपयशचं आलय. कराडमध्ये बाबांच्या समर्थकांच्या आघाडीला आमदार बाळासाहेब पाटील यांच्या गटाने चांगलाच धक्का दिलाय. पृथ्वीराज चव्हाणांच्या समर्थकांनी जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. जनशक्ती आघाडीसाठी मुख्यमंत्र्यांनी प्रचारही केला होता. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचं निवडणुकीच्या निकालानंतर उघड झालंय. मुख्यमंत्र्यांच्या जनशक्ती आघाडीला केवळ सहा जागा मिळाल्यात, तर विरोधकांनी तब्बल २३ जागांवर कब्जा मिळवत सत्ता काबीज केलीय. या निकालामुळे मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसलाय.

 

पृथ्वीराज चव्हाणांप्रमाणेच त्यांच्याच पक्षातील नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांचीही तीच गत झाली आहे. कोकणातील राजकीय वर्चस्वावरून राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर जाधव यांच्यात वाद झाला. पण मतदारांनी दोघांनाही ‘जोर का झटका’ दिला. वेंगुर्ला, सावंतवाडीत राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली तसेच राणेंच्या मालवणमध्येही काँग्रेसला बहुमत मिळवता आले नाही. भास्कर जाधवांनी चिपळूणमध्ये पक्षाविरोधात आघाडीचा प्रयोग करुन बघितला. पण त्यात त्यांना यश आलं नाही. नगरपालिकांच्या या निवडणुकीत मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री या दोघांना चांगलाच चटका लागलाय. नगरपालिकांची निवडणूक ही 'मिनी विधानसभा' म्हटली जाते त्यामुळे भविष्यात या नेत्यांना आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.