नांदेडचे रस्ते नेदरलॅंडसारखे.... वापर मात्र शून्य

परदेशातील योजनांचे अनुकरण करताना बऱ्याच वेळा आपण आपले हसे करुन घेतो, याचे उदाहरण म्हणून नांदेडमधल्या रस्ते विकास योजनकडे पाहता येईल. नेदरलँडच्या धर्तीवर कोट्यवधी रुपये खर्चून चार पदरी रस्ते बनवले खरे, मात्र ज्या हेतूसाठी ते बनवले ते हेतू पूर्ण होताना दिसत नाही.

Updated: Dec 18, 2011, 04:30 AM IST

झी २४ तास वेब टीम, नेदरलॅंड

 

परदेशातील योजनांचे अनुकरण करताना बऱ्याच वेळा आपण आपले हसे करुन घेतो, याचे उदाहरण म्हणून नांदेडमधल्या रस्ते विकास योजनकडे पाहता येईल. नेदरलँडच्या धर्तीवर कोट्यवधी रुपये खर्चून चार पदरी रस्ते बनवले खरे, मात्र ज्या हेतूसाठी ते बनवले ते हेतू पूर्ण होताना दिसत नाही. नेदरलँडमध्ये वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात सायकलींचा वापर केला जातो. इंधन आणि पैशांची बचत, पर्यावरण रक्षणबरोबरच शारिरीक व्यायाम. या सर्व बाबींचा विचार करुन या देशातल्या नागरिकांनी सायकल वापरास प्राधान्य दिलं. त्यामुळं सायकल वापराचे प्रमाण लक्षात घेऊन खास रस्ते बनवण्यात आले.

 

विशेष म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना सायकल वापराच्या प्रोत्साहनासाठी खास भत्ता दिला जातो. अशा या खास रस्त्यांची भुरळ आपल्या राजकारण्यांनाही पडली आणि ७० कोटी रुपये खर्चून नेदरलँडच्या धर्तीवर नांदेडमध्ये रस्ते बनवण्यात आले. परंतू ज्या हेतूनं हे रस्ते बनवण्यात आले, ते हेतू सोडून इतर सर्व गोष्टींसाठी या रस्त्यांचा वापर होताना आपल्याला दिसतो. सायकलीसाठीचा लेन तर शोधून सापडत नाही. कारण हा लेन व्यापला आहे फेरीवाले आणि पार्किंग केलेल्या वाहनांनी.

 

फुटपाथचा वापर होतो तो चालण्यासाठी नव्हे तर दुकानादारांना साहित्य ठेवण्यासाठी. रस्त्यांची हि अशी अवस्था करायची होती, तर कोट्यवधी रुपये खर्चण्याची जरुरी काय होती. रस्त्यांचा हा फसलेला डाव महापौरही मान्य करत आहेत. आपल्या गरजा लक्षात न घेता केवळ पाश्चातांचे अंधानुकरण केल्यास कसा बोजवारा उडतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे नांदेडचे रस्ते.