www.24taas.com, भंडारा
अण्णा हजारेंच्या राज्यव्यापी दौऱ्यात सोनिया आणि राहूल गांधींची बदनामी करणारी पुस्तकं वाटण्यात येतात. पण, अण्णांना मात्र याचा थांगपत्ताही नसतो. ही घटना उघडकीस आलीय भंडाऱ्यामध्ये.
सक्षम लोकायुक्ताच्या नियुक्तीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सध्या राज्याचा दौरा करतायत. राज्यातल्या विविध भागात जाऊन सभा घेण्याचा अण्णांचा धडाका सुरु आहे. या दौऱ्यापूर्वी आपण कुणालाही वैयक्तीक टीकेचं लक्ष्य करणार नसल्याचं अण्णांनी जाहीर केलं होतं.
मात्र भंडा-यात अण्णांच्या सभेत 'सोनिया की बर्बरता या साजिश ?', 'कौन नाच रहा है किसके इशारे पर?' या पुस्तकांचं वाटप करण्यात आलं. या पुस्तकात काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आलीय. अण्णांची सभा संपल्यावर लगेचच काही लहान मुलं ही पुस्तक वाटत होती. आमच्या प्रतिनीधींनी त्यांना गाठण्याचा प्रयत्न केल्यावर ती अंधारात पळून गेली.
गोंदियाच्या अण्णांच्या सभेतही असा प्रकार घडला होता. त्यामुळे अण्णांच्या कार्यक्रमात नेमकी ही पुस्तकं कुणी वाटली, अण्णांना याबाबत माहिती होती का, असे प्रश्न आता उपस्थित झाले असून याबाबत जोरदार चर्चा रंगू लागलीय. याबाबत अण्णांना कुठलीही माहिती नसल्याचं अण्णांचे निकटवर्तीय सुरेश पाठारे यांनी सांगितलंय.
[jwplayer mediaid="102145"]