कधी होणार कसाबचा हिसाब?

ज्याने अनेक निरपराध लोकांचे बळी घेतलेत त्या कसाबवर आता पर्यंत तब्बल २६ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. एकाद्या व्हीव्हीआयपीलाही लाजवेल एव्हडा खर्च कसाबच्या सुरक्षेवर करण्यात आला आहे. आणि माहिती खुद्द गृहमंत्र्यांनीच दिली आहे.

Updated: Apr 12, 2012, 11:42 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

दहशतवादी  कसाबसाठी  कडेकोट बंदोबस्त

कसाबला पोसण्याचा खर्च २६ कोटी रुपये !

कधी होणार कसाबला फाशी?

जनतेनं किती काळ सहन करायचा  भुर्दंड?

कधी होणार कसाबचा हिशेब?

 

ज्याने अनेक निरपराध लोकांचे बळी घेतलेत त्या कसाबवर आता पर्यंत तब्बल २६ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. एकाद्या व्हीव्हीआयपीलाही लाजवेल एव्हडा खर्च कसाबच्या सुरक्षेवर करण्यात आला आहे. आणि माहिती खुद्द गृहमंत्र्यांनीच दिली आहे.

 

जेवण : ३४ हजार ९७५ रुपये

औषध : २८ हजार ६६ रुपये

बराकीचे बांधकाम : ५ कोटी २५ लाख रुपये

पोलिसांचे वेतन : १ कोटी २२ लाख रुपये

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस: १९ कोटी २८ लाख रुपये

एकूण खर्च : २५ कोटी ७५ लाख १ हजार ४१ रुपये

 

हा खर्च  एखाद्या सरकारी  उच्चपदस्थ व्यक्तीवर केला गेला असावा असं तुम्हा वाटलं असेल तर तुमचा अंदाज साफ चुकला आहे. कारण महाराष्ट्र सरकारने हा खर्च केला आहे, २६/११च्या मुंबई हल्ल्यातील कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी  अजमल आमिर कसाब याच्यावर. आज पर्यंत राज्य सरकारने कसाबवर २५ कोटी ७५ लाख १ हजार ४१ रुपये  खर्च केले आहे... ही माहिती राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनीच दिली आहे.

 

मुंबई हल्ल्याच्या वेळी निर्दयी अजमल आमिर कसाबने  अनेक निष्पाप नागरिकांचा जीव घेतला आहे. मात्र त्याला जीवंत ठेवण्य़ासाठी  सरकारला हा खर्च करावा लागतो आहे. कसाबवर आज पर्यंत झालेल्या खर्चाची माहिती  सरकारला विचारण्यात आली होती. त्यावर उत्तर देतांना गृहमंत्र्यांनी कसाबवर झालेल्या खर्चाची अकडेवारीच सादर केली आहे. कसाबवर झालेल्या खर्च पाहाता त्याला लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

 

सध्या कसाबला मुंबईतील आर्थररोड तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. त्याच्यासाठी तुरुंगात स्वतंत्र बराकीचे बांधकाम करण्यात आलं आहे. तुरुंगात कसाबच्या जीवाला धोका होवू नये यासाठी हे विशिष्ट प्रकारचे सेल तयार करण्यात आलं आहे. कसाबच्या  सुरक्षेसाठी पोलिसांबरोबरच इंडो-तिबेटियन बॉर्डरचे जवान तैनात करण्यात आले आहेत. २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील कसाब हा मुख्य आरोपी असून त्याच्या सुरक्षितते बाबतीत विशेष काळजी घेतली जात आहे. आर्थर रोड तुरुंगात कसाबला दिल्या जाणा-या जेवणाविषयी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. कसाबचं जेवण तयार करण्यासाठी तुरुंगात ६ स्वयंपाकी असल्याचा दावा पाटील यांनी केला होता.

 

गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी जयंत पाटील यांचा दावा फेटाळून लावत इतर कैद्यांना दिले जाणारे   जेवण  कसाबला  दिलं जात असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलंय. कसाबच्या सुरक्षेवर मोठ्या प्रमाणत खर्च होत आहे. विशेषत: इंडोतिबेटियन बॉर्डर जवानांच्या वेतनाचा खर्च जवळपास १९ कोटी रुपये इतका आहे. तो खर्च केंद्राकडं जमा करावा लागणार आहे. कसाबाच्या जेवणापासून ते त्याच्या सुरक्षे पर्यंत केला जाणाऱ्या खर्चाचा आकडा मोठा असला तरी कसाब हा पाकिस्तानच्या  दहशतवादी कारवायांचा  सबळ पुरावा आहे. त्यामुळेच त्याच्या सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेतली जात असल्याचं सरकारकडून सांगितलं जात  आहे. मात्र हा खर्च जनतेच्या पैशातून केला जात असून तो आणखी किती काळ सहन करायचा असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडाला.