आई कसे फेडू तुझे ऋण....

आजचा मदर्स डे जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्यासाठीही तितकाच महत्वाचा आहे. त्यांची किडनी फेल झाल्यानंतर आईनं त्यांना किडनी देऊन दुसरा जन्मच दिला.

Updated: May 13, 2012, 09:20 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

आजचा मदर्स डे जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्यासाठीही तितकाच महत्वाचा आहे. त्यांची किडनी फेल झाल्यानंतर आईनं त्यांना किडनी देऊन दुसरा जन्मच दिला. आईच्या या पुण्याईच्या जोरावर डॉ. तात्याराव लहाने हजारोंना नवी दृष्टी देत आहेत. मदर्स डेच्या दिवशी डॉक्टर तात्याराव लहानेही आईच्या आठवणीत भावूक होऊन जातात.

 

अर्थात त्याचं कारणही तसंच आहे. बारा वर्षांपूर्वी डॉ. लहाने यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या आईनं एक किडनी देऊन त्यांना जणू दुसरा जन्मच दिला. मुलासाठी दोन्ही किडन्या देण्याची तयारी अंजनाबाई लहाने यांनी दर्शवली होती. मात्र शस्त्रक्रिया करून त्यांची एकच किडनी बसवण्यात आली.

 

त्याच किडनीच्या जोरावर डॉ तात्याराव लहाने हजारो रूग्णांना जीवनात प्रकाश देत आहेत. हा प्रसंग आठवल्यावर अंजनाबाईंच्याही डोळ्याच्या कडा पाणवतात. मुलाला पुन्हा एकदा दुसरा जन्म देणारी माता, आणि मातेच्या पुण्याईच्या जोरावर अंधांना दृष्टी देणारे पुत्र मदर्स डेच्या दिवशी इतरांनाही प्रेरणा देणारा आहे.