www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारच्या कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी मुख्याध्यापकांनाच जबाबदार ठरवले आहे. याबाबतचे परिपत्रक लागू करण्यात आलं आहे. दरम्यान वाहतुकीची जबाबदारी खासगी कंत्राटदारांवर असल्यानं याबाबतची सर्व जबाबदारी स्विकारण्यास मुख्याध्यापकांनी नकार दिलाय.
महाराष्ट्रात विद्यार्थांची खासगी रिक्षा आणि टॅक्सीने वाहतूक करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यापुढे खाजगी रिक्षा आणि टॅक्सीतून येणाऱ्या विद्यार्थांची जबाबदारी शाळांतील मुख्याध्यापकांवर देण्यात आली. त्याचप्रमाणं प्रत्येक स्कूलबसमध्ये महिला परिचर, मुलांचा विमा उतरविणे, वाहनचालकाची दरवर्षी वैद्यकीय तपासणी सक्तीची करण्यात आली आहे.
गाडीमध्ये गाणी वाजविण्यावर मनाई करण्यात आली आहे. तसेच बसमध्ये प्रथमोपचार, अग्निशमन यंत्र उपलब्ध असेल आणि वर्षांतून दोन वेळा त्याची चाचणी घेण्याची जबाबदारी शाळेच्या अधिकाऱ्यांवर असेल. तसंच प्रत्येक विद्यार्थ्यांचा रक्तगट आणि आणीबाणीच्या परिस्थितीतील संपर्क क्रमांक हा तपशील बसमध्ये असला पाहिजे, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ