www.24taas.com,मुंबई
सिनिअर कॉलेजच्या १९९१ नंतरच्या प्राध्यापकांना नेट-सेटमधून वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. त्यामुळं या प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळालाय.
या निर्णयामुळे सहा हजार आठशे ७८ प्राध्यापकांना याचा फायदा होणार आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळं १९९१ नंतरच्या प्राध्यापकांना आता कायम करण्यात येणार आहे. त्यांना पेन्शनही लागू करण्यात येणार आहे. प्राध्यापकांची संघटना एमफुक्टोनं मात्र सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीय.
१३ पैकी केवळ एकच मागणी मान्य केल्याचं एमफुक्टोच्या अध्यक्षा ताप्ती मुखोपाध्याय यांनी सांगितलंय. तसंच इतर मागण्या मान्य झाल्याशिवाय पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय. ८ मार्चला आझाद मैदानावर जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही एमफुक्टोनं दिलाय.
कॉलेज प्राध्यापकांच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाल्याने, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झालीय. टीवाय, बीएससीच्या विद्यार्थ्यांनाही यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
एम फुक्टो या प्राध्यापकांच्या संघटनेनं प्रॅक्टिकल परीक्षांवर टाकलेल्या बहिष्कारामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. दुसरीकडे ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार कायम ठेवल्यानं १२वीचे निकाल लांबण्याची भीती आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत तोडगा निघाल्याने आंदोलनाची धार बोथट झाली आहे.