www.24taas.com, झी मीडिया, धुळे
मुंबईत मनसे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय चढाओढ दिसून येत आहे. हीच चढाओढ आता महाविद्यालयात दिसून येत आहे. यंदा महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने युवा सेनेवर बाजी मारली आहे.
महाविद्यालयांमधील सचिव निवडणूक ही नामांकन पद्धतीने होत असली तरी राजकीय रंग भरण्यास सुरूवात झाली आहे. यंदा या निवडणुकीत युवा सेनेची पिछेहाटी झाली. युवा सेनेचा बालेकिल्ला असलेल्या कीर्ती आणि पाटकर महाविद्यालयांमध्ये मनविसेकडून जोरदार धक्का बसलाय.
युवा सेना तसेच मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी निवडणुकांसाठी महाविद्यालयांबाहेर गर्दी केली होती. या वर्षीच्या कीर्ती महाविद्यालयामध्ये अस्मिता रावले, रूपारेलमध्ये चैतन्य पवार, चेतनामध्ये अतुल चव्हाण, पाटकरमध्ये सुरज पाटील, सराफमध्ये नेहा शर्मा, विवेक महाविद्यालयात मयूर विश्वकर्मा, दालमिया महाविद्यालयात रेश्मा पाटील, मंडणगड महाविद्यालयात प्रसन्ना र्मचडे, संस्कारधाम महाविद्यालयात तृप्ती मयेकर, गोदाबाई परुळेकर महाविद्यालयात जिग्नेश मोर, साठय़े महाविद्यालयात श्याम साने या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
या विद्यार्थ्यांनी मनविसेच्या बाजूने असल्याचे मनविसेने दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, युवा सेनेने यंदा चांगली मोर्चेबांधणी केली होती तरी त्यांना मुंबईत मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले. आता मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकांकडे लक्ष्य असल्याचे सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी म्हटले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.