आज अकरावीची दुसरी यादी होणार जाहीर

आज संध्याकाळी ५ वाजता जाहीर होणार्‍या अकरावीच्या दुसर्‍या यादीनंतर बड्या, नामांकित कॉलेजबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लागण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत नाकारलेल्या ६१ हजार ५१५ प्रवेश अर्जांना ऍडमिशनची अपेक्षा.

Updated: Jul 4, 2012, 05:48 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

आज संध्याकाळी ५ वाजता जाहीर होणार्‍या अकरावीच्या दुसर्‍या यादीनंतर बड्या, नामांकित कॉलेजबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लागण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत नाकारलेल्या ६१ हजार ५१५ प्रवेश अर्ज, दुसर्‍या यादीत बेटरमेंटच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसह प्रवेश यादीत नाव न आलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे डोळे आजच्या गुणवत्ता यादीकडे लागले आहेत. नामांकित महाविद्यालयातील अकरावीच्या उपलब्ध जागा पाहता तिसर्‍या म्हणजेच शेवटच्या यादीसाठी जागा शिल्लक राहण्याची शक्यता फारच कमी आहे.
विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेसाठी अकरावी ऑनलाईनची दुसरी गुणवत्ता यादी उद्या ४ जुलै रोजी सायं ५ वाजता जाहीर होणार आहे. या यादीनुसार प्रवेश घेण्यासाठी ५, ६ व ७ जुलै रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत मुदत आहे. त्यानंतर तिसरी म्हणजेच शेवटची यादी १० जुलै रोजी जाहीर होणार आहे. पहिल्या यादीत नाकारलेल्या ६१ हजार ५१५ विद्यार्थ्यांच्या अर्जांचा विचारही उद्याच्या यादीत होणार असल्याने उद्यानंतरच प्रवेशाचे चित्र स्पष्ट होणार आहे. या यादीसाठी एकूण ८५ हजार ९७४ जागा उपलब्ध आहेत.


अकरावीच्या पहिल्या यादीच्या तुलनेत दुसर्‍या यादीत एक ते दीड टक्क्यांनीच घट होईल, अशी शक्यता प्राचार्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी शेवटच्या यादीसाठी अकरावीच्या फक्त १० ते १२ जागाच शिल्लक राहिल्या होत्या. पहिल्या यादीत मिळालेला प्रवेश रद्द करून दुसर्‍या यादीतील बेटरमेंटनुसार प्रवेश घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे दुसर्‍या यादीनंतरच सर्वच जागा भरण्याची शक्यता आहे.