आदिवासी : ऐकलं नाही असं काही...

दसरा-दिवाळी हे जोडशब्द एक वेगळाच उत्साह घेऊन येतात. दसऱ्यापेक्षाही दिवाळी हा अधिक मोठा आनंदोत्सव. अपवाद बहुदा जव्हार-मोखाड्याच्या आदिवासींचाच... कारण तिथं जास्त महत्त्व असतं ते दस-याला. जव्हार ही देशातल्या पहिल्या आदिवासी संस्थानाची राजधानी. दस-याला आपल्या राजाला सोनं द्यायला यायची गेल्या शेकडो वर्षांची परंपरा हे आदिवासी बांधव आजही पाळतायत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 1, 2013, 05:50 PM IST

.

जव्हारचा दसरा
दसरा-दिवाळी हे जोडशब्द एक वेगळाच उत्साह घेऊन येतात. दसऱ्यापेक्षाही दिवाळी हा अधिक मोठा आनंदोत्सव. अपवाद बहुदा जव्हार-मोखाड्याच्या आदिवासींचाच... कारण तिथं जास्त महत्त्व असतं ते दस-याला. जव्हार ही देशातल्या पहिल्या आदिवासी संस्थानाची राजधानी. दस-याला आपल्या राजाला सोनं द्यायला यायची गेल्या शेकडो वर्षांची परंपरा हे आदिवासी बांधव आजही पाळतायत.
मुकणे हे इथलं राजघराणं... त्यांच्यापैकी आता कोणीच जव्हारमध्ये रहात नाही. पण आदिवासी समाज इतका परंपरानिष्ठ की, सोनं घ्यायला कोणी येवो-न येवो, ते द्यायला आदिवासी स्त्री-पुरूष नटून थटून येतातच येतात... मग रात्रभर संपूर्ण शहरात नुसती धम्माल असते... कुठे तारपा नृत्य सुरू असतं, कुठे रस्त्याच्या बाजूला दुकानांमध्ये खरेदी सुरू असते, तर कुठे दूर-दूरच्या गावात राहणारे आप्त भेटीगाठी घेत असतात... दस-याची रात्र आख्खं शहर जागं असतं... मात्र गेल्या काही वर्षांपासून या तारपा नृत्यांची जागा गरबा घेत असलेला दिसतोय... मुळातच नृत्याला सरावलेले आदिवासींचे पाय हा गुजराती नृत्य प्रकारही सहज आत्मसात करत असले, तरी त्यामुळे पारंपरिक तारपा, ढोल नृत्य, थाळी नृत्य, बांबू नृत्य हे प्रकार काळाच्या पडद्याआड जाण्याची भीती आहे... जमेल तेव्हा कधीतरी जरूर जव्हारला जा आणि तारप्याच्या तालावर वेगानं रिंगणात फिरून गरब्यापेक्षा शेकडो पट मजा देणारा अनुभव घ्याच....

दस-याची `ऐकीव` प्रथा
जव्हारच्या या दस-याशी एक `प्रथा` जोडली आहे म्हणे... ही केवळ ऐकीव गोष्ट असली, तरी फारच इंटरेस्टिंग आहे... समजा एक आदिवासी मुलगा आणि मुलगी यांचं एकमेकांवर प्रेम असेल आणि गावक-यांचा मात्र त्याला विरोध असेल तर हा विरोध कायद्यानं मिटवणारी ही प्रथा आहे. हे तरुण तरुणी एकाच पाड्यातले-गावातले असतील किंवा वेगवेगळ्या गावचे... त्यांनी एकच करायचं. दस-याच्या रात्री दोघांनी एकत्र पळून जायचं. जव्हार आणि आपल्या गावापासून लांब जायचं की तिथंच कुठेतरी लपून बसायचं, ते त्यांच्यावर. अट एकच. त्यांनी दुस-या दिवशीचा सूर्य उगवेपर्यंत गावक-यांना सापडायचं नाही. ते पकडले गेले, तर त्यांचं काही खरं नाही. पण सुदैवानं ते सुर्योदयापर्यंत लपून राहिलेच, तर गावक-यांना त्या दोघांचा पाट (लग्न) लावून द्यावाच लागतो...
ही प्रथा खरी की खोटी माहित नाही. तसं मी तरी प्रत्यक्ष बघितलेलं नाही. केवळ ऐकीव गोष्ट आहे. पण यामुळे आदिवासी समाज आपल्यापेक्षा किती पुढचा विचार करतो, याचं हे उदाहरण आहे... प्रेमी जोडप्याला एकत्र येण्याची पूर्ण संधी देणारा हा लोकशाही मार्ग आहे... कुणा कुणाला आवडली ही `प्रथा`? कोण कोणाला घेऊन जातंय मग पुढल्या वर्षी दस-याला जव्हारला?

पाहुणचार शिकावा तो त्यांच्याकडूनच...
आदिवासी म्हटला की डोळ्यासमोर येतं ते एकतर गरीब झोपडीत राहणारा लाकूडतोड्या... कमी कपड्यांमधल्या स्त्रीया... अंगणात खेळणारी नागवी मुलं... पण खरं चित्रं असं नसतं... एकदा एखाद्या आदिवासी पाड्यावर जाऊन त्यांच्याशी मैत्री करून बघा. अनोळखी लोकांशी सहसा आदिवासी माणूस बोलत नाही. पण एकदा मैत्री झाली की त्यांच्यासारखा मित्रच नाही. तुमच्यासाठी ते वाट्टेल ते करतील.
मुळातच स्वार्थीपणा, मी-माझं हे त्यांच्या संस्कृतीतच नाही. जे आहे ते निसर्गानं दिलेलं आहे. ते प्रत्येकाचं आहे, हीच शिकवण त्यांना मिळालेली असते. त्यांच्यात मी-पणा नसतोच, असतो केवळ बुरजेपणा... या बुजरेपणामुळेच हा आदिवासी समाज मुख्य प्रवाहात आला नाही. अर्थात, तो मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या तथाकथित उच्चभ्रू समाजानं काहीच केलेलं नाही, हे खरं... पण त्यामुळेच कदाचित मैत्री, पाहुणचार हे भाव त्यांच्यात टिकून आहेत.
कोणत्याही आदिवासी पाड्यावर गेल्यानंतर या पाहुणचाराचा अनुभव जागोजागी येतो... आपल्या तोंडातला घास काढून तुम्हाला देतात... स्वतःची गैरसोय सहन करून तुम्हाला सुखात ठेवण्याचा प्रयत्न करतात... आपण फार खुल्या दिलाचे आहोत, असा कुणाचा समज असेल तर त्यांनी एखाद्या पाड्याला भेट देऊन खरा दिलदारपणा शिकून घ्यायलाच हवा...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
*