लक्ष्मणला धोनीची साथ मिळाली नाही - गांगुली

व्ही. व्ही. एस लक्ष्मणने शनिवारी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. यामध्येच भारतीय टीमचा माजी कॅप्टन सौरव गांगुली यानं, लक्ष्मणला धोनीची योग्य साथ मिळाली नसल्याचं सांगत एकच खळबळ उडवून दिलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 19, 2012, 02:59 PM IST

www.24taas.com, कोलकाता
व्ही. व्ही. एस लक्ष्मणने शनिवारी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. यामध्येच भारतीय टीमचा माजी कॅप्टन सौरव गांगुली यानं, लक्ष्मणला धोनीची योग्य साथ मिळाली नसल्याचं सांगत एकच खळबळ उडवून दिलीय.
आपल्याला धोनीपर्यंत पोहचण्यासाठी कठिण वाटलं, असं वक्तव्य शनिवारी लक्ष्मणनं पत्रकार परिषदेत केलं होतं. यावर गांगुलीनं आश्चर्य व्यक्त केलंय. ‘संघाचा कॅप्टन त्याच्या खेळाडूंसाठी २४ तास उपलब्ध असायला हवा. धोनीनं असं का केलं, हे मला कळत नाहीय. पण, लक्ष्मणला धोनीचा पाठिंबा मिळाला असता तर परिस्थिती वेगळी असती’ असं म्हणत गांगुलीनं एकप्रकारे धोनीवर टीकाच केलीय.
‘लक्ष्मणचा या निर्णयात वाईट काहीच नाही. हा उत्कृष्ट निर्णय आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत लक्ष्मणनं निवड समितीलाही स्पष्ट संदेश दिलाय’ असं म्हणत त्यानं निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्यावरही निशाना साधला. इतकंच नाही तर श्रीकांत यांची निवड पद्धत भारतीय क्रिकेटसाठी हानिकारक असल्याचंही गांगुलीला वाटतंय.
‘माझ्यापेक्षाही लक्ष्मणसाठी हा निर्णय घेणं खूप कठिण ठरलं असेल. मी तर फक्त सीरिज खेळत होतो आणि मी निवृत्तीचा निर्णय घेतला. पण लक्ष्मणच्या बाबतीत म्हटलं तर, तो आयपीएलमध्येही खेळू शकणार नाही. या सीझनमध्ये खेळण्यासाठी तो ‘एनसीए’मध्ये कठोर मेहनत घेत होता. पण, ‘हॅट्स ऑफ’ लक्ष्मण... तो त्याच्या निर्णयामध्ये २०० टक्के योग्य आहे’ असं सौरव गांगुलीनं म्हटलंय.