www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
वेस्ट इंडिजविरूद्ध टेस्ट सीरिजचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे.. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सचिनच्या निवृत्तीची वेळही जवळ येऊन ठेपली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सचिन तेंडुलकर १९९वी टेस्ट खेळणार आहे. ईडन गार्डन स्टेडियम हे मास्टर ब्लास्टकरता लकी ठरलं आहे. त्यामुळे कोलकाता टेस्टमध्येही सचिन नक्की सेंच्युरी ठोकेल असा विश्वास त्याच्या फॅन्सना आहे.
सचिन तेंडुलकर हा क्रिकेटमधील एक अवलिया. त्याचे फॅन्स हे जगाच्या कानाकोप-यात आहेत. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे प्रत्येक क्रिकेटर्स सचिनचाच खेळ पाहून मोठे झाले आहेत. सचिनच्या खेळाने प्रभावित न झालेला क्रिकेटर आणि फॅन सापडणं ही दुर्मिळातील दुर्मिळ गोष्ट आहे. मैदानातील त्याची उपस्थिती आणि बॅटच्या जोरावर हुकूमत गाजवण्याचं अंगी बाणलेलं कसब. यांमुळेच सचिन आज क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो.
क्रिकेटचा आत्मा असणारा सचिन वेस्ट इंडिजविरूद्ध टेस्ट सीरिजनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे... क्रिकेटची मजा लूटत. आपल्या खेळीने कोटी-कोटी फॅन्सच्या चेह-यावरून ओसंडून वाहणारा उत्साह पाहून सचिनलाही आनंद होत असे. मात्र तो आनंद. सचिनची ती खेळी. त्याची ती आकर्षक फटकेबाजी. या सीरिजनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फॅन्सना अजिबात पाहायला मिळणार नाही आहे. त्यामुळेच स्वत: सचिनही आपली ही फेअरवेल सीरिज कायम स्मरणात राहिल अशी करण्यास सज्ज असेल. सचिन करिअरमधील १९९वी टेस्ट कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळणार आहे. ईडन गार्डन स्टेडियम हे सचिनसाठी नेहमीच लकी ठरलं आहे.
सचिनने ईडन गार्डन्स स्टेडियमवर एकुण आंतरराष्ट्रीय 25 मॅचेस खेळल्या आहेत. ज्यांत 13 वन-डे आणि 12 टेस्ट मॅचेसचा समावेश आहे. 1989 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणा-या सचिनने आतापर्यंत ईडन गार्डनवर झालेली भारताची एकही मॅच मिस केलेली नाही... विंडिजविरूद्धची सीरिजमधील पहिली टेस्ट ही सचिनची ईडन गार्डन्सवरील 13 वी टेस्ट असेल... तसं सचिन आणि कोलकाता स्टेडियमचं नातं फारच घट्ट आहे.
कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेटरपेक्षा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय 25 मॅचेस सचिनने ईडन गार्डन्सवर खेळल्या आहेत. मास्टर ब्लास्टरच्या महासेंच्युरीची अवघं जग जितक्या आतूरतेने वाट पाहात होतं.. तितक्याच आतूरतेने फॅन्स त्याच्या आता 101व्या आंतरराष्ट्रीय सेंच्युरीची वाट पाहत आहेत. द.आफ्रिकेविरूद्ध केपटाऊन टेस्टमध्ये जानेवारी 2011मध्ये सेंच्युरी झळकावल्यानंतर. सचिनच्या खात्यात एकाही टेस्ट सेंच्युरीची नोंद झालेली नाही. त्यामुळे ईडन गार्डन्सवर सचिन नक्कीच टेस्टमधील सेंच्युरीजचा दुष्काळही भरून काढेल अशी आशा फॅन्सना आहे.
ईडन गार्डन्सवर खेळलेल्या 12 टेस्टमध्ये सचिनने 47.88च्या सरासरीने दोन सेंच्युरी झळकावताना 862 रन्स चोपून काढले आहेत... ज्यांत त्याने वेस्ट इंडिजविरूद्ध 30 ऑक्टोबर 2002मध्ये सर्वाधिक 176 रन्सची खेळी केली होती. त्यामुळे आताही वेस्ट इंडिजविरूद्धच टेस्ट सीरिज असल्याने सचिन नक्की सेंच्युरी झळकावेल अशी भाकितं अनेक क्रिकेट पंडित व्यक्त करत आहेत.
सचिननेशेवटची टेस्ट सेंच्युरी झळकावली ती 14 फेब्रुवारी 2010मध्ये द. आफ्रिकेविरूद्ध केपटाऊन टेस्टमध्ये. या टेस्टमध्ये सचिनने सेंच्युरी झळकावताना 106 रन्सची खेळी केली होती. केवळ इतकंच नाही तर ईडन गार्डन्सवर सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन म्हणूनही सचिन तेंडुलकरचंच नाव अग्रस्थानी आहे. सचिनच्या नावे वन-डे आणि टेस्ट मॅचेस मिळून तब्बल 1 हजार 358 रन्सची नोंद आहे. त्यामुळे सचिनची आतापर्यंतची कारकीर्द आणि त्याचा ईडन गार्डन्सवरील इतिहास पाहता, आगामी वेस्ट इंडिज सीरिज ही सचिनसाठी आणि त्याच्या फॅन्ससाठी अविस्मरणीय ठरणार यांत शंका नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.