डेक्कन चार्जर्सचा खेळ `खल्लास’…

बीसीसीआयच्या लीगनं पुन्हा एकदा क्रिकेटला बदनाम केलं आहे. पहिल्यांदा बीसीसीआयनं कोची टस्कर्स केरलाचा खेळ खल्लास केला होता आणि आता डेक्कन चार्जर्सलाही अलविदा केला आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 15, 2012, 06:25 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
बीसीसीआयच्या लीगनं पुन्हा एकदा क्रिकेटला बदनाम केलं आहे. पहिल्यांदा बीसीसीआयनं कोची टस्कर्स केरलाचा खेळ खल्लास केला होता आणि आता डेक्कन चार्जर्सलाही अलविदा केला आहे. करारातील नियमांचा भंग केल्यामुळे चार्जर्सना डिस्चार्ज करण्याचा निर्णय आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलनं घेतला आहे. दरम्यान, डेक्कनला हायकोर्टाचा दिलासा मिळाला आहे. कोर्टानं बीसीसीआयच्या निर्णयावर स्थगिती आणली आहे.
बीसीसीआयची आयपीएल अर्थातच इंडियन प्रिमियर लीग बदनाम आहे. या लीगच्या बदनामीची मालिका कायम आहे. आयपीएलच्या या बदनाम पीचवर क्लीन बोल्ड झाली डेक्कन चार्जर्सची टीम. आणि या टीममधील क्रिकेटपटूही... बीसीसीआयनं डेक्कन चार्जर्सच्या टीमला आयपीएलमधून निलंबित तर केलचं. शिवाय त्या तमाम क्रिकेटपटूंच्या खिशाला कात्रीही लावली जे या टीमशी निगडीत आहेत. आता, या क्रिकेटपटूंना आपले पैसे कधी मिळतील याची गॅरंटी नाही. आणि हे पैसे मिळतीलच हेही अजून निश्चित झालेलं नाही. आश्चर्याची बाब म्हणजे डेक्कनला निलंबित करण्याचा निर्णय हा तडकाफडकी घेण्यात आला. आणि तो ही चेन्नईमध्ये झालेल्या एमर्जन्सी बैठकीत....
बीसीसीआय़च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कनला निलंबित करण्यामागे त्यांनी करारात नियमांचं उल्लंघन केलं असं कारण दिलंय. ‘डेक्कन क्रोनिकल्स’ सध्या फायनान्शिअल क्रायसिसचा सामना करतेय. त्यामुळे क्रोनिकल्स चार्जर्समध्ये पैसे गुंतवू शकत नव्हती आणि क्रिकेटपटूंची थकबाकीही देऊ शकत नव्हती. यामुळे त्यांनी अनेक बँकांकडून कर्जही घेतलं होतं. काही दिवसांपूर्वी क्रोनिकल्सनी टीमला विकण्यासाठी टेंडरही मागविले होते. ज्यामध्ये पीव्हीपी व्हेंचर्सनं ९०० कोटीला टीमला खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, डेक्कन क्रोनिकल्सनीं हा प्रस्ताव नाकारला. दरम्यान, डेक्कन क्रोनिकल्सनी बीसीसीआयच्या वर्किंग कमिटीमध्ये तमाम मुद्यांवर तोडगा निघेल असा दावा केला होता. मात्र, तसं काहीच झालं नाही आणि कोची टस्कर्सनंतर डेक्कन चार्जर्सलाही आयपीएलमधून आपला गाशा गुंडाळावा लागला आहे.