चॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियासमोर लंकन चॅलेंज

चॅम्पियन्स ट्रॉफीची प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या टीम इंडियाचा आत्तापर्यंतचा प्रवास अपराजित राहिलाय. आता फायनल गाठण्यासाठी सेमी फायनलमध्ये लंकन चॅलेंज पार करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. आज कार्डिफमध्ये हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 20, 2013, 09:23 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, वेल्स
चॅम्पियन्स ट्रॉफीची प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या टीम इंडियाचा आत्तापर्यंतचा प्रवास अपराजित राहिलाय. आता फायनल गाठण्यासाठी सेमी फायनलमध्ये लंकन चॅलेंज पार करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. आज कार्डिफमध्ये हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आत्तापर्यंत अपराजित असलेली टीम इंडिया विजयाला गवसणी घालण्यापासून केवळ दोन पाऊल दूर आहे. फायनल गाठण्यासाठी सेमी फायनलमध्ये धोनीच्या युवा ब्रिगेडला लंकन चॅलेंजला सामोर जाव लागणार आहे. खरतर, टीम इंडिया आणि श्रीलंका या दोन शेजारील राष्ट्रांमध्ये यापूर्वी अनेकदा लढती झाल्या आहेत. २०११ च्या वर्ल्डकप फायनलमध्येदेखील हे सख्खे शेजारी आमने-सामने होते. यामुळेच दोन्ही टीम्सला एकमेकांच्या कमकुवत आणि मजबूत बाबींची चांगलीच जाणीव असेल. दरम्यान, आता टीम इंडियामध्ये खूप बदल झाले आहेत. धोनीच्या दिमतीला सध्या युवा चॅम्पियन्स आहेत आणि टीम इंडियाने प्रॅक्टीस मॅचमध्ये लंकेला पराभूत केलंय. यामुळेच टीम इंडियाचं पारडं लंकेच्या तुलनेत जड आहे.
शिखर धवन आणि रोहित शर्मा ओपनिंगला धमाका करत आहेत. त्यांच्याकडून पुन्हा तशाच दमदार ओपनिंगची आशा आहे. धवन आणि रोहितने मीडल ऑर्डरला चमक दाखवण्याची फारशी संधीच दिलेली नाही. तरीही विराट कोहली आणि सुरेश रैना हे धोकादायक ठरू शकतात. याशिवाय दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावरही भिस्त असेल. तर बॅट आणि बॉलने जबरदस्त कामगिरी करणाऱ्या रवींद्र जाडेजावर पुन्हा एकदा साऱ्या आशा एकवटलेल्या असतील. तो टीम इंडियासाठी ट्रमकार्ड ठरत आहे. जाडेजाबरोबर अश्विनची फिरकी लंकेचा घात करायला सज्ज असेल. दरम्यान, फास्ट बॉलिंग टीम इंडियासाठी नेहमीच चिंतेची बाब राहिलीय. मात्र, युवा भुवनेश्वर कुमारने प्रत्येक मॅचमध्ये भारताला पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत अपेक्षा वाढवल्या आहेत. तर ईशांत शर्मा आणि उमेश यादवकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
दुसरीकडे श्रीलंकेच्या बॅटिंग लाईन अप नजर टाकल्यास त्यांच्याकडे आक्रमक बॅट्समन आहेत. तिलकरत्ने दिलशान आणि कुशल परेराच्या रुपात त्यांच्याकडेही आक्रमक ओपनिंग जोडी आहे. तर कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने ही अनुभवी जोडीही त्यांच्याकडे आहे. याशिवाय अॅन्जेलो मॅथ्यूज आणि लाहिरु थिरिमन्ने यांनाही बॅटिंगमध्ये जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. फास्ट बॉलर लसिथ मलिंगा हा लंकेसाठी ट्रम कार्ड ठरु शकतो. नुवान कुलसेकरा आणि रंगना हेराथवर मलिंगाला हातभार लावण्याची जबाबदारी असेल.

दोन्ही टीम्सच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकल्यास टीम इंडियाची वाटचाल अपराजित आणि आत्मविश्वासपूर्ण राहिलेली आहे. म्हणूनच टीम इंडिया श्रीलंकेपेक्षा वरचढ वाटतेय. तरीही श्रीलंका प्रॅक्टीस मॅच आणि २०११ वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाची परतफेड करण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर चॅम्पियन्स ट्रॉफीला गवसणी घालायचीच याच ध्येयानेच वाटचाल करणारी टीम इंडिया लंकन चॅलेंजचा अडथळाही पार करु याच आत्मविश्वासाने मैदानावर उतरेल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.