प्रशांत अनासपुरे, www.24taas.com, मुंबई
शहरातली `प्रेमाची गोष्ट` सांगितल्यानंतर दिग्दर्शक सतीश राजवाडेने थेट खेडेगावातली गोष्ट पडद्यावर आणलीये. त्यामुळे शहरी प्रेमातून थेट खेडेगावतलं गावरान प्रेम सतीश पडद्यावर कशा प्रकारे आणतोय, याची याची उत्सुकता होतीच. मात्र प्रेमाची ही दुसरी गोष्टही सतीशने यशस्वीपणे पडद्यावर मांडलीये, असं नक्कीच म्हणता येईल. पण यशाची ही नौका पार करताना कलाकारांचा अभिनय हीच जमेची बाजू म्हणता येईल..त्यामुळे ही नुसतीच प्रेमाची गोष्ट नाहीये, तर एक सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न सतीशने केलाय.
काय आहे ‘पोपट’ची कथा?
कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुलथे गावातल्या तीन मित्रांची ही गोष्ट आहे. ‘काय बी झालं तरी गड्यांनु, आपला पोपट कुठंबी व्हता कामा नये’, असा या त्रिकुटाचा फंडा असतो. अगदी जीवाभावाचे हे मित्र. यातल्या एका मित्राला सिनेमाता काम करण्याची भारी आवड असते. मुंबई-पुण्यातल्या लोकांच्या सिनेमाचं शूटिंग त्यांच्या गावात होतं. त्यावेळी हा मित्रही त्यात भाग घेतो. मात्र त्याचा झालेला अपमान या मित्रांना सहन होत नाही. आणि हे तिघेजण स्वतःच सिनेमा काढायचं ठरवतात. मात्र त्यांच्याकडे कॅमेरामन कोणीच नसतो. म्हणूनच जना उर्फ जनार्दन (अतुल कुलकर्णी)च्या रुपानं त्यांना चौथा मित्र भेटतो आणि ही ‘शिनेमा’ची कथा आणखी फुलत जाते. तर मग सिनेमा काढताना आणि तोही एड्ससारख्या संवेदनशील विषयावर... त्यांना काय-काय कसरती कराव्या लागतात हे पाहणं मनोरंजक ठरतं...
लक्षवेधी अभिनय...
‘नटरंग’नंतर अतुल कुलकर्णीची ही आणखी एक वेगळी आणि तितकीच कौतुकास्पद भूमिका म्हणावी लागेल. अभिनय न करता येण्याचा अभिनय करणं अतुलने यात खासच जमवलंय. मोजक्तयाच पण वेगळ्या प्रकारच्या भूमिका निवडताना अतुल त्या किती बारकाईने पाहतो, याचं ‘पोपट’ हे उदाहरणच म्हणावं लागेल. तर राणी मुखर्जीच्या ‘अय्या’मधून आपल्या अभिनयाची झलक दाखवलेल्या अमेय वाघनेही चांगला अभिनय केलाय. ‘शाळा’फेम केतन पवारच्या एन्ट्रीलाही प्रेक्षकांची दिलखुलास दाद मिळते. केतनचा सरळसाधा अभिनय भाव खाऊन जातो. तर सिद्धार्थ मेननची भूमिकाही तितकीच वेगळी ठरतेय. एकूणच काय, लोकेशन्सची मर्यादा असूनही केवळ कलाकारांच्या अभिनयामुळे हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरलाय, असं म्हणायला हरकत नाही.
सिनेमात काय नाही?
सतीश राजवाडेची कथा तसंच चिन्मय केळकरचे संवाद यातून ही खेडेगावातली कथा फुलवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मात्र एड्सविषयी जनजागृतीचा संदेश देणारी ही कथा काहीशी जुनीच वाटते. त्यामुळे सिनेमाला काहीशा मर्यादा आल्यात. सध्याच्या तरुणाईला हा संदेश कितपत रुचेल आणि पचेल याचं काहीसं भान दिग्दर्शकाने सांभाळायला हवं होतं. मात्र, एकूणच मेघा घाडगेच्या लावणीचा तडका, उर्मिला कानेटकरच्या रोमॅण्टिक गाण्याची मेजवानी आणि नव्या कलाकारांसह अतुल कुलकर्णीने जमवलेली अभिनयाची जुगलबंदी, यासाठी हा सिनेमा पाहण्यास हरकत नाही. थोडक्यात काय, प्रेक्षकांचा पोपट होणार नाही, याची खबरदारी जणू याच कलाकारांनी आपल्या खांद्यावर घेतलीये, असं म्हणूया...
स्टार- साडेतीन स्टार
पोपट
दिग्दर्शक- सतीश राजवाडे
कलाकार- अतुल कुलकर्णी, अमेय वाघ, सिद्धार्थ मेनन, केतन पवार, मेघा घाडगे, नेहा शितोळे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.