www.24taas.com झी मीडिया, पाटणा
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी पाटण्यातील दोन मुलींना दोन लाख रूपयांची मदत केली होती. मात्र त्या मुलींची आई ते दोन लाख रूपये घेऊन बेपत्ता झाल्याने बिग बी यांची मदत वाया गेली आहे.
पाटण्यातील रिमझिम आणि अंजली या दोन मुलींना अमिताभ बच्चन यांनी मदत केली होती. रिमझिम १२ तर अंजली ११ वर्षाची आहे. या दोन मुलीना त्यांच्या आईने वाऱ्यावर सोडले आणि ती निघून गेली. या मुली सध्या पाटणा येथील एक शाळेतील प्राध्यापक अविनेश्वर प्रसाद सिंह यांच्याकडे शिकतात आणि त्यांच्याकडेच राहतात.
या मुलींची आई मुजफ्फरपुरची रहीवासी असल्याचा दावा करत होती. या महिलेने आपल्या मुलींना शांती निकेतन या शाळेत दाखल केले आणि त्यानंतर ती महिला बेपत्ता झाली. अमिताभ बच्चन यांना या अल्पवयीन मुलींची माहिती एका न्युज चॅनेलद्वारे समजली आणि त्यांनी मुलींना मदत करण्याचे ठरवले.
अमिताभ बच्चन हे उत्तरप्रदेशमधील बाराबंकी येथे एका शाळेच्या उद्घाटनाला जाणार असून तेथे या मुलींची भेट अमिताभ यांच्याशी होणार होती. पण या कार्यक्रमाच्या ३ दिवस अगोदर या मुलींची आई सर्वांसमोर आली. पती जेलमध्ये असल्याने तिला अधिक कठीण परस्थितींना तोंड द्यावे लागल्याने ती परत आली नाही, असं कारण तिने सांगितले.
शिखा पांडे नावाची ही महिला आपल्या दोन्ही मुलींना घेऊन बाराबंकीला गेली. कार्यक्रमाच्या दिवशी या दोन्ही मुलींना उचलून घेत अमिताभ यांनी दोन लाखांचा चेक या मुलींच्या आईच्या हातात दिला. हा चेक त्या मुलींच्या चांगल्या भवितव्यासाठी दिला गेला आहे, असंदेखील अमिताभ यांनी सांगितले.
या दोन्ही मुली दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या आईसोबत शाळेत आल्या. आपल्या मुलींना परत नेण्यासाठी येणार असल्याचे वचन देऊन ती महिला तो चेक घेऊन निघून गेली आणि परत आलीच नाही. अशी माहिती सिंह यांनी सांगितली. अमिताभ यांना भेटल्यानंतर या दोन मुलींच्या आईकडून झालेल्या फसवणुकीची कल्पना नक्की देऊ, असं सिंह यांनी म्हटलं आहे.
रिमझिम आणि अंजली सुरूवातीचे काही दिवस रात्रीच्या रडत असत. पण आता त्या मुली सावरल्या आहेत. आता या मुलींना आपल्या आईविषयी बोलणंही आवडत नाही. या दोन बहीणींपैंकी मोठ्या बहीणीला म्हणजे रिमझिमला मिरगी हा आजार झाला आहे. प्राध्यापक सिंह यांना आता मुलींची देखभाल करणं कठीण होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.