www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पती बिझनेसमन संजय कपूर यानं आपल्या दोन मुलांच्या कस्टडीसाठी बांद्रा फॅमिली कोर्टात नवी याचिका दाखल केलीय. मुलांसाठी आता करिश्माला पतीसोबत कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून करिश्मा आणि संजय यांच्यादरम्यान मुलांच्या कस्टडीसाठी तणाव वाढलाय. मुलांसाठी वाट्टेल ते करण्याची हिंमत दाखवणारी करिश्माही मोठय़ा हिंमतीने हा खटला लढण्यासाठी तयार असल्याचं समजतंय.
करिश्मा आणि संजय कपूर हे मागील काही काळ एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. दोघेही घटस्फोटासाठी तयार आहेत; परंतु कागदी कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही. मुलांच्या ताब्यासोबत आणखी एका कारणामुळे करीश्मानं अद्याप घटस्फोटाच्या कागदांवर सही केलेली नसल्याचं समजतंय. करिश्मानं संजयला घटस्फोटाच्या बदल्यात सात करोड रुपयांच्या पोटगीची मागणी केलीय... आणि पोटगीसाठी एवढी रक्कम मोजायला संजय तयार नाही. करिश्मानं मात्र यापेक्षा कमी किंमतीमध्ये घटस्फोटाच्या कागदांवर सही करणार नाही, असं ठामपणे बजावलंय.
29 सप्टेंबर 2003 रोजी विवाहबद्ध झालेल्या या दाम्पत्यात पहिली कन्या समैराच्या जन्मानंतर खटके उडण्यास सुरुवात झाली. करिश्माने समैराला सोबत घेऊन घर सोडले होते. पण कालांतराने संजय कपूरने तिला मागे आणले. नंतर दोघांनी अल्पकाळ सुखाने संसार केला आणि कियानचा जन्म झाल्यानंतर परस्परांतील वाद चांगलाच चिघळला.
यादरम्यान करिश्माने संजयचे दिल्लीतील घर कायमचे सोडून मुंबईतील माहेर गाठले. सध्या ती आई बबीतासोबत राहत आहे. ती समैरा आणि कियान या दोन मुलांना भेटू देत नसल्यामुळे संजय कपूरने आपल्या मुलांचा कायदेशीर ताबा मिळवण्यासाठी पाऊल उचलले आहे.
संजयनं याअगोदर 9 वर्षांच्या मुलीची कस्टडी मागितली होती. पण, आता मात्र त्यानं दोन्ही मुलांचा ताबा आपल्याकडे असायला हवा, यासाठी अर्ज केलाय. संजयच्या वतीने वकील जलाजा नाम्बियार, नारायण सुवर्णा आणि राधिका मेहता यांनी करिश्माविरोधात वांद्रेतील कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.