www.24taas.com, मुंबई
काळ बदललाय, हेच खरं. सध्याची बॉलिवूडची नंबर १ अभिनेत्री करीना कपूर हिने आज अभिनेता आणि पतौडी संस्थानचा नवाब सैफ अली खान याच्याशी विवाह केला. मात्र तरीही तिने सैफ अली खानचा मुस्लिम धर्म स्वीकारण्यास नकार दिला असून ते सैफने मान्यही केले आहे.
करीना कपूर आपल्या सासू शर्मिला टागोर यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुस्लिम धर्म स्वीकारेल असा सर्वांचा होरा होता. मात्र करीनाने धर्मांतरास नकार दिला आहे. करीनाने लग्नापूर्वीच ही अट घातली होती आणि ती सैफने मान्यही केली आहे.
मात्र करीनाच्या सासू शर्मिला टागोर या बंगाली हिंदू अभिनेत्रीला मात्र त्यावेळी इतकं स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. मुळातच जेव्हा या अभिनेत्रीने क्रिकेटर आणि पतौडी संस्थानचे नवाब मन्सुर अली खान पतौडी यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिच्या आणि मन्सुर अली खान या दोघांच्याही घरच्यांचा या विवाहास विरोध होता. शर्मिलाच्या सासू भोपाळच्या बेगम साजिदा सुलताना यांना एक नाच-गाणी करणारी, बिकिनीतल्या फोटोशूट करणारी सेक्सी अभिनेत्री सून म्हणून मान्य नव्हती. मात्र जर मन्सुर अली आन आणि शर्मिला टागोर यांना विवाहबद्ध व्हायचं असेल, तर शर्मिलाने इस्लाम धर्म स्वीकारावा अशी अट तिला घातली गेली. अन्यथा, त्यांच्या होणाऱ्या मुलांना पतौडी घराण्याच्या संपत्तीतून बेदखल केलं जाईल अशी आडून धमकीही दिली गेल्याचं म्हटलं जातं. त्यानुसार शर्मिला टागोर धर्मांतर करून ‘आएशा सुलतान’ बनली. तिने बॉलिवूडलाही राम राम ठोकला. मात्र कालांतराने पुन्हा रुपेरी पडद्यावर रुजू होऊन काही संस्मरणीय भूमिका सादर केल्या.
सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंगने देखील लग्नात मुस्लिम धर्म स्वीकारला होता. मूळची शीख असणाऱ्या अमृताने १९९१ साली सैफ अली खानशी गुप्तपणे विवाह केला होता. मात्र करीनाने धर्मांतरास नकार देण्याचं धाडस दाखवून नवा पायंडा पाडला. करिश्मा, करीना या कपूर लहानपणापासून सर्वधर्मियांमध्येच वावरल्या आहेत. त्यांच्या आईची आई म्हणजे आजी ही ख्रिश्चन होती.
तरीही करीनाने हिंदू राहाण्याचाच निर्णय घेतला आहे. “मला लग्नानंतर माझ्या करीना कपूर या नावापुढे खान लावायला आवडेल. पण, लग्नानंतरही मी गणपती, दिवाळी यांसारखे माझे सण साजरे करतच राहाणार आणि लहानपणापासून मी ज्या मंदिरांमध्ये जाते, तेथे जातच राहाणार.” असं करीनाने ठणकावून सांगितलंय.
सैफनेही या गोष्टीला संमती देत म्हटलं, की माझा धर्मांतरावर विश्वास नाही. करीनाने धर्म बदलावा, असं मला मुळीच वाटत नाही. मी आपल्या भारत सरकारचे याबद्दल आभार मानतो,की त्यांनी यासंदर्भात विवाह विशेष कायदा बनवला आहे. यामध्ये आंतरधर्मिय लग्नानंतर पत्नीला पतीचा धर्म न स्वीकारण्याची मुभा आहे.
शाहरुख खाननेही जेव्हा गौरीशी लग्न केलं होतं, तेव्हा तिने धर्मांतर करण्यास नकार दिला होता. उलट, शाहरुख खान स्वतः हिंदू होण्यास राजी होता. मात्र एकमेकांच्या धर्मांचा आदर बाळगत आपापल्या धर्मांशी एकनिष्ठ राहून लग्न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. मात्र सैफ-करीनाच्या मुलांचा धर्म कुठला असेल, हे त्यांना मुलं झाल्यावरच ते ठरवतील.