‘प्रेगनन्सी क्लॉज’ला करीनाचा नकार, रामलीलामधून बाहेर!

या सिनेमात करीना मुख्य भूमिकेसाठी ही फिल्म साईन करत होती पण, तिनं प्रेगनन्सीच्या बाबतीतल्या अटींना नकार दिल्यानं तिला या चित्रपटातून बाहेर पडावं लागलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 26, 2012, 03:48 PM IST

www.24taas.com, मुंबई
मधुर भांडारकरचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘हिरोईन’ला एक जोरदार धक्का मिळाला होता, जेव्हा ऐश्वर्यानं सगळ्यांना गोड बातमी दिली होती. पण, मधुर मात्र चांगलाच तापला होता. त्यानं तर आपला ड्रीम प्रोजेक्ट बंद करण्याचाही निर्णय घेतला होता. पण, अचानक करीना कपूर त्याच्यासमोर आली आणि हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण झाला. मधुरच्या या अनुभवानं बॉलिवूडकरांना मात्र चांगलंच दक्ष केलंय. संजय लीला भन्साळीनंही मधुरच्या अनुभवावरुन काही धडे घेतलेत. आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी कोणतीही रिस्क घ्यायला तो तयार नाही. संजयच्या या दक्षपणामुळे मात्र करिनाला एका सिनेमातून बाहेरचा रस्ता धरावा लागलाय.
सूत्रांच्या माहितीनुसाक, प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यानं आपल्या आगामी सिनेमा ‘रामलीला’साठी करीना कपूरला साइन केलं होतं. पण, हा सिनेमा आता करीनाच्या हातातून निसटल्याची माहिती मिळतेय. यासंबंधी करीना आणि भन्साळी यांच्यात पैशासंबंधी काही गोष्टी खटकल्यानं करीना यातून बाहेर पडल्याचं म्हटलं जात होतं. पण आता नवीच माहिती बाहेर येतेय. वास्तविक, संजय लीला भन्साळीनं करीनाला साईन करताना एक नव्या नियमांनुसार एक कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. यामध्ये ‘प्रेगनन्सी’संदर्भात असलेल्या अटींवर सही करण्यास करीनानं नकार दिला. या सिनेमात करीना मुख्य भूमिकेसाठी ही फिल्म साईन करत होती पण, तिनं प्रेगनन्सीच्या बाबतीतल्या अटींना नकार दिल्यानं तिला या चित्रपटातून बाहेर पडावं लागलंय.
सिनेमा स्वीकारताना अनेक हिरोईन्सला कॉन्ट्रॅक्टमधल्या याच अटींच्या अडचणीचा सामना करावा लागतोय. महत्त्वाचं म्हणजे, अगोदरच सावध झालेले दिग्दर्शक या अटींवर अडून राहताना दिसतात. पुढच्या महिन्यात सैफ अली खानशी विवाहाच्या बंधनात अडकणा-या करीनानं या अटींना नकार देऊन सिनेमा गमावलाय.