www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमला काल ‘प्राईड ऑफ द नेशन’ या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. नुकताच रिलीज झालेला त्याचा चित्रपट ‘मद्रास कॅफे’मध्ये जॉननं केलेल्या रॉ एजंटच्या भूमिकेतून राजीव गांधी हत्याकांडाचा संवेदनशील मुद्दा प्रेक्षकांसमोर आणला. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात दहशतवादी विरोधी मोर्चाचे अध्यक्ष एम. एस. बिट्टा यांच्या हस्ते जॉनचा पुरस्कारानं सन्मान करण्यात आला.
“मद्रास कॅफे या चित्रपटाच्या माध्यमातून जॉननं राजीव गांधी हत्याकांडामागील कटाचा पर्दाफाश करण्याचा साहसी प्रयत्न केला”, या शब्दात बिट्टा यांनी जॉनचं कौतुक केलं. १९८०च्या दशकाच्या शेवटी आणि १९९०च्या सुरूवातीच्या वर्षांवर आधारित मद्रास कॅफे हा चित्रपट बनवण्यात आला. त्यावेळी श्रीलंकेत कलह माजला होता आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या झाली होती.
राजीव गांधी यांच्या हत्येच्या कटाचा निप:क्ष तपास सुरू झाला पाहिजे, असं यावेळी बिट्टा म्हणाले. तर मद्रास कॅफेचा निर्माता असलेल्या जॉननं आता आपण अब्दुल हमीद यांच्यावरही चित्रपट बनवणार असल्याचं सांगितलं. अब्दुल हमीद हे १९६५मध्ये पाकिस्तान विरुद्ध लढतांना शहीद झाले होते. त्यांना मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ प्रदान करण्यात आलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.