www.24taas.com,मुंबई
बिग बी अमिताभ नाराज आहे. त्यांने जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यासाठी ट्विटरचा आसरा घेतला. पुरस्कारासाठी गुणवतेचा निकष डावलला जातोय, असे त्यांने ट्विट करताना म्हटलंय. आपण अधिक काही बोललो तर पुरस्कारांचे ‘पोलखोल’ होईल. अनेकांना ते परवडणार नाही आणि सहनही होणार नाही, असेही बिग सांगतात.
हल्ली बॉलीवूडमध्ये पुरस्कार हे गुणवत्ता आणि कामगिरीमुळे मिळत नाहीत. तुमचे इतरांशी ‘लागेबांधे’ कसे आहेत हे पाहून पुरस्कार दिले जातात, अशी नाराजी हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे.
‘गुरू’ चित्रपटासाठी अभिषेकला पुरस्कार न मिळाल्याचे ही खंत असल्याचे बोलले जात आहे. अमिताभ यांनी शुक्रवारी रात्री अभिषेकसोबत बसून दूरदर्शनवर ‘गुरू’ चित्रपट पुन्हा एकदा पाहिला. त्या चित्रपटातले अभिषेकचे काम बघून माझी छाती गर्वाने फुलून गेली. ‘गुरू’साठी त्याला एकही पुरस्कार मिळाला नाही याची खंत वाटली आणि माझे डोळे भरून गेले, असे अमिताभ यांनी म्हटलंय.
अभिषेकची समजूत काढताना आपण त्याला ‘दिवार’चे उदाहरण दिले. ‘दिवार’साठी आपणांस कोणताही पुरस्कार मिळाला नव्हता. दिलीपकुमार यांनाही ‘गंगा जमुना’ चित्रपटासाठी काहीच मिळाले नव्हते. माझ्या दृष्टीने तो त्यांचा सर्वोत्तम परफॉर्मन्स होता असेही अमिताभ यांनी ट्विट केले आहे.