<b>फिल्म रिव्ह्यू : बिनडोक `वॉर... छोड ना यार!`</b>

बॉलिवूडमधला हा पहिला सिनेमा असेल ज्यामध्ये भारत-पाकिस्तानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर उभे असलेले सैनिक तुम्हाला कॉमेडी करताना दिसतील.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 12, 2013, 05:40 PM IST

सिनेमा : वॉर छोड ना यार
दिग्दर्शक : फराज हैदर
निर्माता : प्रशांत नारायणन, श्रीकांत भासी
संगीत : असलम केई
कलाकार : शर्मन जोशी, सोहा अली खान, जावेद जाफरी, संजय मिश्रा, मुकुल देव, मनोज पाहवा, दलील ताहिल

बॉलिवूडमधला हा पहिला सिनेमा असेल ज्यामध्ये भारत-पाकिस्तानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर उभे असलेले सैनिक तुम्हाला कॉमेडी करताना दिसतील. सिनेमात सोहा अली खान, शरमन जोशी, जावेद जाफरी आणि मुकुल देव यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमात शर्मन जोशी एका भारतीय सैनिकाच्या भूमिकेत आहे तर जावेद जाफरी पाकिस्तानी सैनिकाच्या... सोहा अली खान एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसते. दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये अशा पद्धतीचा सिनेमा लोकांसमोर येतोय. भारत-पाकिस्तानचं वैर संपवण्याचा संदेश देण्यासाठी पहिल्यांदाच कॉमेडीचा वापर करण्यात आलाय.
काय आहे कथानक...
भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांतील लोकांना युद्धजन्य परिस्थिती किंवा तणावपूर्ण वातावरण नकोय. हीच या लोकांची भावना या सिनेमातून समोर येते. दोन्ही देशांतील सामान्य लोकांना हवंय सौहार्दपूर्ण वातावरण आणि शांती... परंतु काही लोक निव्वळ आपलं हित साधण्यासाठी देशातील लोकांना भडकावण्याचं काम करतात ज्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. हे लोक म्हणजे काही राजकारणी असू शकतात किंवा तिसला देश ज्याला स्वत:चं हित साधायचंय. ‘वॉर.. छोड ना यार’ याच गोष्टींना अधोरेखित करतो. हा विषय अतिशय गंभीर असला तरी त्याला मांडण्यासाठी हास्याची फोडणी देण्यात आलीय. त्यामुळे मुद्दे लोकांना पचायला जड जात नाही.
‘वॉर... छोड ना यार’मध्ये दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये इतके चांगले संबंध निर्माण होतात की ते आपले स्वादिष्ट पदार्थ एकमेकांना भरवतात, अंताक्षरी खेळतात. लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरसाठी जसे भारतीय वेडे आहेत त्याचप्रमाणे पाकिस्तानातही असे वेडे आढळतात. परंतु, वरिष्ठांचा आदेश मिळाल्यानंतर मात्र या सैनिकांना एकमेकांवर गोळ्या झाडाव्या लागतात. दिग्दर्शकानं हीच गोष्ट मनोरंजक पद्धतीनं समोर आणलीय.
भारत-पाकचे संबंध बिघडवण्यासाठी चीन आणि अमेरिकेचा हस्तक्षेप कारणीभूत असल्याचं सिनेमात दाखवण्यात आलंय. चीनमध्ये बनवल्या जाणाऱ्या स्वस्त वस्तुंचा आपल्या देशातल्या नागरिकांनी बहिष्कार टाकायला हवा. या सर्व गोष्टी लेख आणि दिग्दर्शक फराज हैदर यानं खूपच बालीश पद्धतीनं प्रेक्षकांसमोर मांडल्यात. हास्य आणि सिनेमा या नावावर त्यानं आपल्याला दाखवायचंय ते मांडलंय परंतु हे मनोरंजन पूर्ण वेळ प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकत नाही.
अभिनय आणि भूमिका
हैदरनं कलाकारांच्या भूमिका उत्तम पद्धतीनं लिहिल्यात आणि सादरही केल्यात. शर्मन जोशी, जावेद जाफरी, संजय मिश्रा, दिलीप ताहिल (चार भूमिका) यांच्या भूमिका मनोरंजनात्मक आहेत. परंतु थोड्या वेळानं सिनेमातील प्रसंग कंटाळवाणे वाटत राहतात. सोहा एका पत्रकाराच्या भूमिकेत आहे. तिला दोन्ही देशात होणाऱ्या युद्धाबद्दल अगोदरच बातमी मिळते आणि ती अगोदरच सीमेवर धडकते. परंतु तीचं पात्र लोकांच्या पचनी पडत नाही.
संगीत
सिनेमा पाहताना कंटाळा आला आणि एखादी डुलकी मारयची असेल तर या सिनेमातील गाणी तुम्हाला ही संधी देतात.
एकूणच काय तर...
रिकामं डोकं घेऊन सिनेमा पाहायला जा... आणि रिकाम्या डोक्यानेच बाहेर पडा....

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.