www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
हिंदी सिनेसृष्टीत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ अभिनेते प्राण यांना आज मुंबईत त्यांच्या घरी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी खास दिल्लीहून ब्रॉडकास्ट मिनिस्टर मनिष तिवारी मुंबईत आले आणि त्यांनी प्राण यांना हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी प्राण कुटुंबीयांच्या साक्षीने देण्यात आलेल्या या छोटेखानी पुरस्कार सोहळ्यासाठी प्राण यांचे काही मोजकेच स्नेही उपस्थित होते.
१२ एप्रिलला हा पुरस्कार जाहीर झाला होता. वयाच्या ९३ व्या वर्षी प्राण यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलंय.... प्राण यांनी रुपेरी पडद्यावर सहा दशकांपेक्षा जास्त काळ गाजवला.
जवळपास ३५० हून अधिक सिनेमांमध्ये प्राण यांनी काम केलं आहे. त्यांच्या चरित्र अभिनेता आणि खलनायक म्हणून साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या. जंजीर, डॉन, अमर अकबर अन्थोनी, जॉनी मेरा नाम या चित्रपटांमधल्या भूमिकांना प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.