अमिताभवर देशद्रोहाचा आरोप... सडकून टीका!

‘फेसबूक’वर व्यक्त केलेल्या एका वक्तव्यामुळे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या देशभक्तीवर विविध स्तरांतून प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 14, 2012, 04:37 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
‘फेसबूक’वर व्यक्त केलेल्या एका वक्तव्यामुळे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या देशभक्तीवर विविध स्तरांतून प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. बिहारच्या नक्षल प्रभावित कैमूर जिल्ह्यात लहानग्यांना शिक्षणाकडे आकर्षिक करण्यासाठी तयार केलेल्या पोस्टरवर अमिताभ बच्चन यांनी आक्षेप घेतला होता. यानंतर देशभरातून त्यांच्यावर सोशल वेबसाईटच्या माध्यमातून टीका होतेय.
बिहार पोलिसांनी माओवाद्यांविरुद्ध आपल्या लढाईत पोलीस भर्तीसाठी लोकांना आकर्षित करण्यासाठी वापरलेल्या एका पोस्टरसाठी अमिताभ बच्चन यांच्या फोटोचा वापर करण्यात आला होता. त्यावर, बिहार पोलिसांचं हे कृत्य बेकायदेशीर, चुकीचं आणि अपमानजनक असल्याचं अमिताभ बच्चन यांनी आपल्या फेसबूक पेजवर टाकलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं होतं. ‘माझ्या किंवा सोनी चॅनलच्या परवानगीशिवाय ते असं करू शकत नाहीत. बिहार पोलिसांनी माझ्या फोटोचा वापर तत्काळ बंद करावा. आम्ही कायदेशीर मार्गांने जाण्यासाठी आमच्या वकिलांशीही याबाबत चर्चा करत आहोत’. यानंतर बिहार पोलिसांनी तत्काळ हे पोस्टर हटवलं होतं. यावर स्पष्टीकरण देत कैमूर जिल्ह्याच्या पोलिसांनी, बच्चन यांच्या नावाचा वापर मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी केला जात होता, तेही पोस्टर बच्चन यांनी आक्षेप घेतल्यानंतर हटवण्यात आलंय, असं म्हटलं होतं.
गेल्या रविवारी बच्चन यांनी आपला आक्षेप सोशल वेबसाईटवर केलं होतं. साहजिकच, त्यावर प्रतिक्रियाही तितक्याच जलद पद्धतीनं उमटल्या. बीग बी च्या या पोस्टला २० हजार पेक्षा जास्त लोकांनी ‘लाईक’ केलंय तर आत्तापर्यंत २५७१ कमेंटस् या पोस्टला मिळाल्यात. यामध्ये अनेकांनी बच्चन यांच्यावर टीका केलीय.
‘बीग बी’वर टीका करताना राहुल शिंगाने म्हणतो, ‘काही लोक आहेत जे कुणाहीबद्दल चांगला विचार करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी पैसाच सर्वकाही असतं. कुणी वाईट काम सोडून चांगल्या मार्गानं जाण्याचा प्रयत्न करत असेल तर या लोकांना हे पाहावत नाही. अमित बाबू तुम्ही खरोखरच बिग बी आहात. रजनीकांत आणि नाना पाटेकरकडून काहीतरी शिका.’

तर सोनू सक्सेना लिहितो, ‘तुम्हाला किती पैसे हवेत, बिहार पोलिसांना तुमचा फोटो वापरण्याची परवानगी देण्यासाठी. थोडी तरी लाज बाळगा अमिताभजी’. तर योगेश भाटिया म्हणतो, ‘प्रिय सर, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. कित्येक लोक तुमची मंदिरं बनवतात तेव्हा मात्र तुम्ही त्याला आक्षेप घेत नाही. तेव्हा तर ते तुम्हाला ‘सुपर ह्युमन बीईंग’ म्हणून आत्मसंतुष्टी देतात. तुम्ही पोस्टरचा उद्देशही लक्षात घ्यायला हवा होता. तरुणांना योग्य मार्गावर चालण्याचाच हा एक संदेश होता. पण तुम्ही मात्र संपूर्ण देशाला चुकीचा संदेश दिलात. हे साफ चुकीचं आहे.’