धनंजय शेळके, प्रतिनिधी, झी २४ तास, मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी राज्यातलं भाजप शिवसेनेचं सरकार पडेल असं भाकित काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. सध्या दोन्ही पक्षात सुरू असलेली चिखलफेक पाहता शरद पवारांच भाकित खरं ठरतं की काय अशी शंका येते. एका खासगी वाहिनीवर बोलताना महाराष्ट्रातले एक नामांकित माजी संपादकांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हे सरकार पडेल असं भाकित केलंय. मात्र सध्याच्या राजकीय स्थितीचा विचार केला तर हे सरकार नक्कीच पडणार नाही असं वाटतंय...त्याची कारणे काय आहेत पाहूयात.
सरकार पडणं हे दोन्ही सत्ताधा-यांना परवडणार नाही. भाजपनं विधानसभेत इतिहासात पहिल्यांदाचं १२३ जागांपर्यंत मजल मारलीय. मोदी लाटेमुळं ते शक्य झालं होतं. आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. मोदी लाट ब-यापैकी ओसरली आहे. त्यातच ग्रामीण भागात राज्य सरकारच्या विरोधात चांगलीच नाराजी वाढली आहे.
पुन्हा निवडणुका झाल्या तर ग्रामीण भागात भाजपला मोठा फटका बसू शकतो. खडसेंचा राजीनामा, काही मंत्र्यांवर सुरु असलेले भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे भाजप पुन्हा निवडणुकीला सामोर जाण्याचं धाडस दाखवण्याची शक्यता कमीच आहे. गेल्यावेळी शहरी भागात पक्षाने अनेक ठिकाणी मोठी मुसंडी मारली आहे. पुण्यात ८ पैकी ८ जागा जिंकल्या आहेत. नागपुरात ६ पैकी ६, नाशिकमध्ये ३ पैकी ३ त्यामुळे या ठिकाणी तर जागा वाढण्याचा प्रश्नच नाही.
मुंबईतही ३६ पैकी १५ जागा पक्षानं जिंकल्या आहेत. त्यामुळे मुंबईसह शहरी भागातही अधिकच्या जागा जिंकण्यावर मर्यादा आहेत. याचा विचार करता भाजप मध्यावधी निवडणूक ओढवून घेईल असं अजिबात वाटत नाही.
दुसरं म्हणजे शिवसेना सरकारचा पाठिंबा काढून घेईल. ही शक्यताही तशी धूसरच वाटते. शिवसेनेनं जर पाठिंबा काढून घेतला तर शिवसेना फुटण्याचा धोका आहे. शिवसनेत उभी फूट पडणं जरी शक्य नसलं तरी पुन्हा हमखास निवडून येण्याची शक्यता असलेले काही आमदार राजीनामा देऊन भाजपात जाऊ शकतात. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही पुन्हा हमखास निवडून येण्याचा विश्वास असलेले काही आमदार भाजपाच्या गळाला लागू शकतात.
तीन्ही पक्षातले मिळून १५ आमदार जरी भाजपच्या गळाला लागले तरी सरकार चालू शकते. त्यातच आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईमध्ये कोणत्याही पक्षाला स्वतःच्या बळावर सत्ता मिळेल, अशी सध्यातरी शक्यता नाही. त्यामुळे आता एकमेकांचे कितीही कपडे फाडले, एकमेकांची औलाद काढली, निंदानालस्ती केली तरी पालिका निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय दिसत नाही. त्यामुळे काहीही झालं तरी हे सरकार टिकणार हेच खरं आहे.