मी, आबा आणि आ'ई' टीव्ही...

Updated: Feb 19, 2015, 04:32 PM IST


 

दीपक भातुसे, राजकीय प्रतिनिधी : माझी आणि आर. आर. पाटील यांची पहिली भेट मला आजही लख्ख आठवते. कारण या पहिल्या भेटीतच हा राजकारणी वेगळा आहे, हे मला जाणवले होते. साध्या राहणीच्या आणि तळागाळातील, ग्रामीण भागातील लोकांशी असलेली तळमळ मला दिसली आणि माझी आणि आबांची व्हेवलेंथ जुळली ती शेवटपर्यंत कायम होती.

आबांची पहिली भेट 
मी त्यांना पहिला भेटलो तेव्हा ते ग्रामविकास, स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री होते. राज्यातील पाणी प्रश्नावर मला एका बातमीसाठी त्यांचा बाईट हवा होता. तेव्हा ते चित्रकूटवरच रहायला होते. साधी सफारी घातलेल्या आबांना मी प्रथमच प्रत्यक्ष भेटत होतो. राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण त्यांना थांबवायची होती, त्याबाबतची तळमळ प्रामाणिक होती ती मला त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. त्यावेळी आर. आर. पाटील नावाचे एक मंत्री आहेत, एवढीच त्यांची महाराष्ट्राला ओळख होती. मात्र आपल्या कामाच्या झपाट्याने आणि त्यांनी लोकांसाठी घेतलेल्या निर्णयाने या माणसाने महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या हृदयात स्थान निर्माण केले होते, तसे ते माझ्याही... त्यानंतर आम्ही वारंवार भेटत राहिलो. या भेटींमधून माझे आणि त्यांचे संबंध दृढ कधी झाले हे समजलेच नाही. पत्रकार आणि राजकारणी एवढ्यापुरताच माझा त्यांना संबंध नव्हता, तर या माणसाची सामान्य माणसासाठी काम करण्याची धडपड पाहून मी या माणसाकडे ओढलो गेलो. स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागात केलेल्या कामामुळे आणि विशेष करून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामुळे त्यावेळी लोक त्यांना आधुनिक गाडगेबाबा म्हणूनच ओळखू लागले होते. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे कष्ट केले. आबांचा मीडियामधील मी जसा एक मित्र होतो, तसे आणखी काही मित्र होते. या मित्रांच्या मदतीने त्यांनी मीडियाच्या माध्यमातून या मोहिमेचं महत्त्व महाराष्ट्राला पटवून दिलं.


आबा आणि दीपक भातुसे

'आबांचा माणूस'
आबा उपुमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या आणि माझ्या भेटी वाढल्या. अनेकदा या भेटी बातम्यापुरत्या असायच्या, पण बातमी कव्हर केल्यानंतरही ती बातमी व्यवस्थित जावी यासाठी आबा जातीने लक्ष द्यायचे. कारण राज्य सरकारची एखादी योजना अथवा मोहीम यशस्वी करायची असेल तर मीडियाचा सहभाग महत्त्वाचा असतो हे त्यांच्या लक्षात आले होते. बातमी कव्हर झाल्यानंतर ती कशी केली आहे, ती कधी दिसणार याबाबत अनेकदा ते त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना फोन करून विचारायला सांगायचे किंवा ते स्वतःही फोन करायचे. त्यावेळी मी ईटीव्हीत काम करत होतो. मला अजूनही आठवतं, मंत्रालयात त्यांची पत्रकार परिषद असली आणि मी वेळेवर पोहोचलो नाही तर त्यांच्या पीएंना मला फोन करून कुठे आहे, कधी पोहचणार हे विचारायला सांगायचे, मी येईपर्यंत पत्रकार परिषद सुरू करायचे नाहीत, त्यामुळे मीडियातील माझे अनेक मित्र मला गंमतीने ‘आबांचा माणूस’ असे चिडवायचे. एका प्रामाणिक राजकारण्याचा माणूस म्हणून

माझे पत्रकार मित्र चिडवत असल्यामुळे मलाही त्यात वाईट वाटायचे नाही. बातमी कव्हर झाल्यानंतर ती कधी दिसणार याबाबतही माझ्याकडे आबांकडून किंवा त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून विचारणा व्हायची. याबाबत मी एकदा माहिती घेतली तेव्हा समजले की आबांची आई आबांना टीव्हीवर बघते म्हणून ते हे विचारतात. आबांची आई आणि इतर कुटुंबीय अंजनी या त्यांच्या तासगावातील गावीच असायचे. कधी तरी ते मुंबईला यायचे. त्यामुळे आपला मुलगा आपल्या नजरेसमोर नाही किमान त्याचे टीव्हीवर तरी दर्शन होते, म्हणून त्यांच्या आईला ही माहिती हवी असायची. अत्यंत कष्टातून, कमवा शिका या तत्त्वावर शिकून आपला मुलगा मोठा झाला याचा अभिमानही आईला आबांना टीव्हीवर बघून व्हायचा. त्यावेळी माझे काही पत्रकार मित्र ईव्हीला गंमतीने ‘आई टीव्ही’ही म्हणायचे.


 

नकारात्मक बातम्यांचा त्रास
आबांच्या सकारात्मक बातम्याच जास्त असायच्या. मात्र चुकून आबांची नकारात्मक, त्यांच्यावर टीका करणारी बातमी गेली की आबा अस्वस्थ व्हायचे. मुळातच ते हळव्या स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांना टीका सहन व्हायची नाही, अशा वेळी ते तातडीने फोन करायचे आणि बातमी थांबवण्याची विनंती करायचे. आबांच्या प्रेमापोटी अनेकदा मी त्यांची ही विनंती मान्य करून ऑफीसला ती बातमी थांबवायला सांगायचो. कदाचित आपल्यावर होणाऱ्या टीकेमुळेर आईला त्रास होईल म्हणून ते हे करत असावेत असं मला वाटतं.

आबांची डान्सबार बंदी 
आबांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला. डान्सबारमुळे तरुण बरबाद होतोय हे त्यांना पाहवत नव्हतं. म्हणून धाडसाने हा निर्णय घेऊन तो टिकावा यासाठी त्यांना न्यायालयातही लढा दिला. डान्सबारमुळे तरुण कसा बरबाद होतो हे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि या निर्णयाच्या बाजूने जनमत तयार करण्यासाठीही त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. डान्सबारमुळे उद्धवस्त झालेल्या कुटुंबियांना, पालकांना ते भेटले. मलाही ते फोन करून अशा पालकांना भेटायला सांगायचे आणि त्यावर बातमी करायला सांगायचे, जेणे करून डान्सबारचे दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहचतील आणि तरुण त्यापासून दूर राहिल.

आबा आणि आई ढसाढसा रडले....
आबांचा त्यांच्या आईवर खूप जीव होता. बातम्यांव्यतिरिक्त मी त्यांना अनेकदा भेटायचो, तेव्हा त्यांच्या बोलण्यात आईचा विषय खूपदा यायचा. अत्यंत गरीबीत वाढलेल्या आबांचे वडिल ते लहान असतानाच गेल्याने आईने मोठ्या कष्टाने आबांना वाढवलं होतं. त्यामुळे आईवर ते अतोनात प्रेम करायचे.
आम्ही कधी गप्पा मारायला बसलो की आबा त्यांच्या या लहानपणीच्या आठवणींनी हळवे व्हायचे. पायात चप्पल नाही, अंगावर फाटके कपडे, पोटाला वेळेवर अन्न नाही, असं मन हेलावून टाकणारे त्यांचे अनुभव ऐकले की मन गहीवरून यायचं. त्यांनी सांगितलेला एक किस्सा तर गरीबीचे चटके काय असतात याची जाणीव करून देणारा आहे. आबां शाळेत असताना अंगावरचा शर्ट


 

फाटला होता. आधीच त्या शर्टला अनेक ठिगळं लावली होती. त्यामुळे आणखी शर्ट कुठे शिवायचा असा प्रश्न आईला पडला होता. त्यावेळी आबांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांची जुनी कपडे एका बाचक्यात बांधून ठेवली होती. आबांनी वडिलांचा त्यातला एक शर्ट काढला आणि तो एका टेलरकडे घेऊन गेले आणि अल्टर करून घेतला. तो शर्ट आबा वापरू लागले. त्यांनी सुरुवातीला आईला हे सांगितलं नव्हतं, पण जेव्हा आईला कळलं तेव्हा त्यांची आई खूप रडली होती. गरिबीचे असे चटके सोसलेल्या आबांना त्यामुळेच गरिबांचीं जाण होती. कमवा शिका योजनेत शिकलेल्या आबांनी गडचिरोली या मागास भागाचे 2009 साली जेव्हा पालकमंत्रीपद स्वीकारले तेव्हा इथल्या 51 आदिवासी मुलांची शिक्षणाची व्यवस्था केली, कदाचित शिक्षणासाठी त्यांना जे कष्ट घ्यावे लागले ते या आदिवासी मुलांना घ्यावे लागू नयेत म्हणून त्यांनी केलेली ही धडपड होती. त्यांची स्वतःची मुलंही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली आहेत.


 

आबांनी तंबाखू सोडली होती पण....
आबांचा कर्करोगाने घात केला. त्यांना तंबाखूचे व्यसन होते. मंत्रालात असले तरी ते सतत तंबाखू खात. अस्वस्थ असले की त्याचे प्रमाण वाढे. एकदा अजित पवारांनी आबांच्या या व्यसनावरून सांगलीतच टीका केली होती. या टीकेनंतर आम्ही पत्रकार आबांना भेटलो. आबा उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या मिटिंग हॉलमध्ये आम्ही बसलो होतो. आबांना आम्ही अजितदादांनी केलेल्या टीकेविषयी विचारले, तेव्हा आबा म्हणाले मी आजपासून तंबाखू सोडली आणि आबांनी शिपायाला सांगून वेलदोडे मागवून घेतले. आमच्यासमोर त्यांनी ते वेलदोडे खाल्ले. माझा कॅमेरामन माझ्याबरोबर होता, त्याने ते सगळे कॅमेऱ्यात टिपले होते. आबांनी तंबाखू सोडली याचा मलाही खूप आनंद झाला होता. कारण मी ही खूप वेळ त्यांना त्याबाबत बोललो होतो. तेव्हा मी ईटीव्हीलाच होतो. आबांवरील प्रेमापोटी मी ती बातमी केली आणि ईटीव्हीच्या ‘महाराष्ट्र माझा’ या बातमीपत्रात हेडलाईन करून ती बातमी दाखवली. मात्र आबांचे ते व्यसन तात्पुरते बंद झाले होते. ते पुन्हा सुरू झाले. तेव्हाच आबांनी ते व्यसन सोडले असते ते माझ्यावरही त्यांच्या आठवणींचा ब्लॉग लिहण्याची दुर्दैव वेळ आली नसती.

मुलींच्या शिक्षणासाठी आबांची आयडिया
26 जानेवारी 2013 ला आबांच्या आग्रहाच्या आमंत्रणावरून तासगावला गेलो होतो. त्यावेळी मुलींच्या शिक्षणाबाबतची आबांची तळमळ दिसून आली. अनेक गावात पाच ते सातवी पर्यंतच शाळा असते. पुढील शिक्षणासाठी मुलांना दूरवर शाळेत जावे लागते. अनेकदा वेळेवळ एसटी बस मिळत नाही किंवा परवडत नाही म्हणून मुलींची शाळा थांबवली जाते. असे होऊ नये म्हणून आबांनी तासगावमधील आठवी ते दहावीत शिकणाऱ्या पाच हजार मुलींना सायकलींचं वाटप केलं. आबांवर प्रेम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला होता. ही सायकल दहावीपर्यंत त्या मुलीने वापरायची आणि पुन्हा ती सायकल दुसऱ्या गरजू मुलीला द्यायची असा हा उपक्रम. आपल्या मतदारसंघातील मुलींना शाळा शिकता यावी म्हणून आबांनी केलेलं हे काम प्रत्यक्ष बघून आबांच्या माणुसकीची उंची किती मोठी आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.


सौ. फेसबूक

आता पुन्हा तासगावला जाणे नाही
2014 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या कव्हरेजसाठी मी पुन्हा तासगावला गेलो होतो. अर्धा दिवस मी त्यांच्याबरोबर फिरत होतो. आबा तासगावातील लहान-लहान गावात फिरून आपला प्रचार करत होते. लोकांना भेटत होते. आबांबरोबर दीर्घ काळ झालेली ही शेवटची भेट होती.
त्यानंतर मुंबईत आमदारांच्या शपथविधीसाठी झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशात आबांची भेट झाली. आबांची दाढ सुजलेली होती. मी त्यांना तेव्हा विचारलेही होते. मला वाटले त्यांनी तंबाखू ठेवली आहे दाढे खाली. मी त्यांना विचारले, आबा एवढी तंबाखू खाल्ली आहे की काय तुम्ही.. ते म्हणाले, नाही रे, दाढ सुजली आहे, दुखतेही आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. माझी आणि आबांची ती शेवटची भेट ठरली. रुग्णालयात त्यांना भेटायला परवानगी नव्हती, त्यामुळे जाता आलं नाही. 16 फेब्रुवारीला ते गेल्याच्या अफवा सकाळपासून येत होत्या. म्हणून त्यादिवशी दुपारी 1.30 वाजता मी लिलावती रुग्णालयात गेलो आणि काही तासातच आबा गेल्याची बातमी देण्याच वेळ माझ्यावर आली. 17 तारखेला त्यांच्या अंत्यविधिच्या कव्हरेजसाठी तासगावला गेलो. ज्या तासगावात आबांमुळे यापूर्वी जाणे झाले होते, त्या तासगावात आबांच्या अंत्यविधिच्या कव्हरेजसाठी एवढ्या लवकर जाण्याची वेळ माझ्यावर येईल असं वाटलं नव्हतं. आता आबा नाहीत त्यामुळे पुन्हा तासगावला जाण्याची वेळ कदाचित येणार नाही...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.