संपादक बाळासाहेब ठाकरे ते संपादक राज ठाकरे... एक उलटे वर्तुळ

राज ठाकरे वर्तमानपत्र काढणार अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे केलेला हा ब्लॉगोटोप...

Updated: Feb 18, 2015, 09:32 PM IST
संपादक बाळासाहेब ठाकरे ते संपादक राज ठाकरे... एक उलटे वर्तुळ title=

प्रकाश दांडगे, झी मीडिया :

राज ठाकरे वर्तमानपत्र काढणार अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे केलेला हा ब्लॉगोटोप...

न खिंचो कमान को,

न तलवार निकालो,

जब तोप मुकाबिल हो

तो अखबार निकालो....


प्रकाश दांडगे

शिवसेनेचा जन्म ज्या मार्मिक साप्ताहिकापासून झाला त्या मार्मिक साप्ताहिकाच्या अग्रभागी असलेलं हे वाक्य..संकटं आली तर त्यांना तोंड देण्यासाठी तलवार उपसण्याची गरज नाही.. तुमच्या हाताशी जर वृत्तपत्र असेल तर तुम्ही संकटांचा सामना करू शकता असा याचा अर्थ..

सध्या चहुबाजुकडून राजकीय संकटात सापडलेल्या राज ठाकरेंना याच वाक्यांनी प्रेरणा दिली असावी..त्यामुळेच ते वृत्तपत्र काढण्याचा विचार करत असावेत..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे राज ठाकरेंचे प्रेरणास्थान..

या नात्याला कितीतरी पदर... काका-पुतण्या, गुरु-शिष्य आणि एकमेकांशी घट्ट मैत्री असलेले दोन कलाप्रेमी...

राजकीय रणधुमाळीत काहीही होवो.. राज ठाकरेंनी आपल्या श्रद्धास्थानावर कधी हल्ला चढवला नाही...

बाळासाहेबांपासून राज ठाकरेंना नेहमीच प्रेरणा मिळत आलीय. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे ठाकरे घराण्याची आद्य प्रेरणा... बाळासाहेबांना प्रेरणा दिली ती प्रबोधनकारांनी....प्रबोधनकारांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला दिशा दिली आणि बाळासाहेबांनीही आपला कुंचला या चळवळीला बळकटी देण्यासाठी वापरला..प्रबोधनकारांच्याच प्रेरणानं मराठी माणसावर होणा-या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जन्म झाला तो मार्मिकचा.  13 ऑगस्ट 1960 ला मराठीतल्या पहिल्या व्यंगचित्र साप्ताहिकाचा जन्म झाला. बाळासाहेब ठाकरेंनी आपले बंधु आणि राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरेंसोबत मार्मिकची सुरवात केली. या मार्मिकमधूनच मग पुढे 19 जून 1966 ला शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेना हे नावही प्रबोधनकारांनीच दिलं. याच चार अक्षरांनी मग पुढचा सगळा इतिहास घडवला. मार्मिकमधून व्यंगचित्रांव्दारे बाळासाहेबांचा कुंचला आग ओकू लागला आणि बाळासाहेबांची व्यंगचित्रं हेच मार्मिकचं बलस्थान झालं. या दरम्यान शिवसेनाही वाढत गेली आणि विरोधकांचे हल्ले परतवण्यासाटी आठवडाभर थांबावं लागतं याची खंत बाळासाहेबांना वाटू लागली... मग विरोधकांचा रोखठोक ठाकरी भाषेत समाचार घेण्यासाठी मार्मिक साप्ताहिकाबरोबरच अवतरला दैनिक सामना... 23 जानेवारी 1989 ला सामनाचा जन्म झाला आणि बाळासाहेब ठाकरेंचा ठाकरी बाणा सामनाच्या पानापानातून रोज गर्जू लागला...

 

आधी व्यंगचित्रे.. त्यातून जन्म झालेलं मार्मिक... मग त्यातून जन्मलेली मराठी बाण्याची शिवसेना आणि नंतर राज्यात भाजपच्या साथीनं केंद्रात आणि राज्यात मिळालेली सत्ता असा प्रवास बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं केला....

बाळासाहेबांपासून प्रेरणा घेतेलेले राज ठाकरेही आता त्याच मार्गाने निघालेत पण त्यांचा क्रम थोडा वेगळा आहे...

संगीतकार श्रीकांत ठाकरेंचे पुत्र स्वरराज ठाकरे वाढले ते  बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मीनाताई यांच्या अंगाखांद्यावर.. शिवसेनेच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये बाळासाहेबांची मुलुखमैदान धडाडत असतांना लहानगे राज ठाकरे स्टेजवरच असत... बाळासाहेबांच्या ठाकरी शैली बरोबरच व्यंगचित्रकलेचा वारसा राज ठाकरेंनी पुढे चालवला... राज यांच्या  व्यक्तिमत्वात अनेकांना दिसते ती बाळासाहेबांची झलक.. राज यांच्या व्यंगचित्रकलेवरही बाळासाहेबांचा प्रभाव दिसतो...

शिवसेना राजकारणात आणि सत्ताकारणात जशी सक्रीय होत गेली तशी मार्मिकमध्ये बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांच्या जागी राज ठाकरेंची व्यंगचित्र दिसू लागली...

पण बाळासाहेबांचा व्यंगचित्रकलेचा वारसा राज ठाकरेंकडे ज्या सहजपणे आला त्या सहजपणे राजकीय वारसा आला नाही...

उद्धव ठाकरेंचा शिवसेनेत उदय होत गेला आणि राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडत गेले... मनानं कधीच शिवसेना सोडलेल्या राज ठाकरेंनी अखेर 9 मार्च 2006 ला स्वत:चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला आणि एक वर्तुळ पूर्ण झालं..त्यावेळीही बाळासाहेब ठाकरे हेचं आपलं दैवत आहे हे सांगायला राज ठाकरे विसरले     नाहित...

गुरु आणि शिष्य यांचा प्रवास बराचसा सारखाच आहे.

व्यंगचित्रकलेतून फटकारे देत बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेनेची स्थापना केली..

बाळासाहेबांच्या शैलीतच फटकारे देणाऱ्या ऱाज ठाकरेंनीही स्वत:ची महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढली...

बाळासाहेबांनी मार्मिक साप्ताहिक आणि सामना दैनिक काढलं...

आता राज ठाकरेही बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत स्वत:च वृत्तपत्र काढत नाही ना?

महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं स्वप्न पहात 2006 मध्ये स्थापन झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगली सुरवात करुनही राजकारणात अद्यापही स्थिरावलेली  नाहिय... लोकसभा आणि विधानसभेतल्या पराभवानं पक्षाला मरगळ आल्यासारखी स्थिती आहे.

त्यामुळंचं राजकीय दृष्या 'तोप मुकाबिल' झाली असतांनाच आपले गुरु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून प्रेरणा घेत वृत्तपत्र काढण्याचा विचार तर राज ठाकरे करत नाहीत ना ?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.