ब्लॉग: कुटुंब

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 29, 2014, 04:22 PM IST
ब्लॉग: कुटुंब title=
प्रातिनिधिक फोटो

केवळ दर दोन दिवसांनी एक लेख लिहून काढणं हा उद्देश नसून प्रत्येक माणसाच्या अंतर्मनातील विचारांना जागृत करण्याचा हा एक प्रयत्न आहे.  कधी जमतंय तर कधी नाही, पण… हा 'मनातला आतला' शोध असाच सुरु राहणार.

एकत्र कुटुंब व्यवस्थेतून विभक्त कुटुंब व्यवस्थेतेकडे जाणाऱ्या समाजाला जर सांभाळायचं असेल तर एक गोष्ट प्रत्येकाच्या अंगी किंवा गळी उतरायलाच हवी ती म्हणजे 'जिव्हाळा'..!  आज घरातल्या प्रत्येक माणसाच्या मनाला गरज आहे ती प्रेमाची. ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’, असं फक्त बोलून कुटुंब जोडली जाणार नाहीत, तर यात त्याचा अंमल होणं गरजेचं आहे.

प्रत्येकानं एक गोष्ट समजून घ्यायलाच हवी, जंगलातल्या झाडांचं ठिक असतं पण घरातल्या रोपट्यांना रोज पाणी घालावंच लागतं. तसंच काहीसं ह्या नात्यांचं आहे. नात्यांवर पण सहवासाचा ओलावा शिंपडावा लागतो.

फार दूर जायचं कारण नाही, अलिकडच्या काळातलं ‘what’s app’ पण केवळ  'ग्रृप'  बनवता येतं म्हणून  'फेमस' होत चाललंय. तथाकथित कॅरिअरच्या मागे धावणारे आईवडील आपल्या पोरांचं पॉकेट मनी वाढवून एकत्र कुटुंबाची भाषा बोलतात आणि आजकालचे नागरिक बेजबाबदार आहेत अशी घोषवाक्य सोडीत असतात. विभक्त कुटुंबपद्धती ह्या करीता किती प्रमाणात जबाबदार आहे, हे कुणी बघितलंय का?

एकटा व्यक्ती काय म्हणून कमावणार, आयुष्यातले सुख दु:ख सांगायला कुणीतरी हक्काचं हवंच असतं आणि ते दुसरं तिसरं कुणी नसून कुटुंब असतं. आज फोफावत चाललेल्या ह्या  'डे'  संस्कृतीमध्ये  'फॅमिली डे' पण समाविष्ट झाला तर नवल वाटायला नको. वर्षभर दूर राहून फक्त एक दिवस भेटायचं आणि मग भुर्रकन उडून जायचं, पुढल्या वर्षी लवकर भेटूया हे आश्वासन देवून.

आज ह्या सुपर सोनीक युगात कुणालाच कुणासाठी वेळ नाही. कुटुंब नावाचा वृक्ष तयार करायला आणि रुजवायला कुणी धजावत पण नाहीये. सेवा, भक्ती, त्याग  ही मुलतत्वे जणू अभासक्रमाचा एक भाग होऊन राहिली आहेत. पूर्वी ह्याच तत्वांवर आधारीत एक मजबूत कुटुंबव्यवस्था समाजात अस्तित्वात होती पण आज  'तो त्याचं बघेल ना' असं म्हणत प्रत्येक जण सुखी आपण सुखी असल्याचंच दाखवायचा दुबळा प्रयत्न करत असतात.

मानवाचे 'अमानुष'पण कमी करून  'माणूस'  पण वाढवता आलं तरंच खरी कुटुंबव्यवस्था अस्तितात येऊ शकते. पिढी जरी बदलतेय, तरी पण मुलांना संस्काराचे बाळकडू आणि स्वतःच्या पायांवर उभे राहण्याची ताकद कुटुंबच देत असतं. आपल्या ह्या कुटुंबाला जोडून त्यांना त्यांचं माधुर्य जपण्याची वेळ आली आहे.

घरात मोठ्या आणि अनुभवी व्यक्तींचे महत्व पटवून द्यायला आजी आजोबा , आईबाबा ह्यांचे असणे आवश्यक आहे. हा मायेचा अनुभवी 'टच' कधीही हरवू नये यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपली कुटुंबव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध जावे लागेल आणि तेव्हाच 'वसुधैव कुटुंबकम्' हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.