विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबादेत पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. अर्ध्या औरंगाबादला शहराला पाणीपुरवठा करणारा हर्सूल तलावही आता पूर्णपणे आटलाय.. शहरात आधीच दोन तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे.. त्यामुळं आता काय होणार या भितीने औरंगाबादकर धास्तावलेत....
वरुणराजा मराठवाड्यावर रुसल्यानं निम्म्या औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणा-या हर्सूल तलावाचं असं मैदानात रुपांतर झालंय.. पाण्याची पातळी खाली गेल्यानं आता या तलावातून पालिकेनं पाण्याचा उपसा बंद केलाय.. त्यामुळं जायकवाडी धऱणाच्या मृत साठ्यातून शहरात पाणीपुरवठा सुरु आहे.. पावसाअभावी तलाव आणि विहीरी आटू लागल्यानं मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय..
या भीषण पाणीटंचाईमुळं औरंगाबादमधल्या नागरिकाचं जणू तोंडचं पाणीच पळालंय.. तलावातील पाणीसाठा संपलाय, जायकवाडीचाही आता नेम नाही असेच राहिले तर पुढे काय अशी भीती नागरिकांना वाटतेय. तर दुसरीकडे इतकी भीषण पाणीटंचाई असताना हा प्रश्न गंभीर नसल्याचं पालिका आयुक्त सांगत आहेत.
पाण्याअभावी पीक, पाणी आणि चारा याचा प्रश्न मराठवाड्यात गंभीर बनलाय.. आकाशात रोज काळे ढग दाटून येतात... त्यामुळं रुसलेला वरुणराजा आता तरी बरसणार का या आशेनं सा-यांच्या नजरा आकाशाकडं लागल्यात...