www.24taas.com, झी मीडिया, तुळजापूर
महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणा-या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील प्रशासन पूर्णपणे कोलमडले आहे. भाविक आणि मंदिराच्या सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
तुळजापूर शहर आणि मंदिर परिसरात कमालीची अस्वच्छता पसरली आहे. प्राधिकरण कामाच्या नावाखाली शहरातील संपूर्ण रस्ते उखडलेले आहेत. निष्क्रिय झालेले मंदिर प्रशासन, भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेली नगरपालिका, मनोधर्य खचलेले पोलीस आणि ढोंगी लोकप्रतिनिधी यांच्या अभद्र युतीचा फटका देवीच्या भक्तांना बसत आहे.
राज्यभरातून दररोज लाखो भाविक नवरात्र मोहत्सवात तुळजाभवानीच्या दर्शनाला येतायत. पण या भाविकांची सुरक्षा सध्या धोक्यात आहे. कारण मंदिरातले मेटल डिटेक्टर सध्या बंद आहेत. कोट्यावधी रुपये उत्पन्न असणा-या मंदिर प्रशासनाकडे फक्त दोनच डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर आहेत. त्यातूनच दररोज येणा-या लाखो भक्तांना तपासणी करून मंदिरात सोडल्याचा देखावा सुरु आहे.
तुळजाभवानी मातेचं दर्शन करण्यासाठी राजे शहाजी महाद्वारातून भाविकांना मंदिरात सोडले जाते. भाविक मंदिरात जाताना, महाद्वारात उभारलेले पोलीस, दिसेल त्यांची बॅग तपासण्यासाठी वर पाठवून देतात. त्याच गर्दीत धक्काबुक्की सहन करत, उतरत्या पाया-यावर भाविकांना आपली बॅग तपासून येई पर्यंत वाट पाहवी लागते. त्यामुळे महाद्वारामध्ये गर्दी तुंबते. . पण याचे मंदिर आणि पोलीस प्रशासनाला काहीच सोयर सुतक नाही,
तुळजापूर शहरातले संपूर्ण रस्ते उखडलेले आहेत. प्राधिकरणाच्या कामच्या नावाखाली गेल्या २ वर्षापासून रस्ते खोदलेले आहेत. महाद्वाराच्या समोर कच-याचा ढीग साचलाय. पण मंदिर प्रशासनाला त्याचं गांभीर्य नाही. मंदिरासमोर लावलेल्या लाकडी बॅरीकेड्स लावण्याचे बिल ५० लाखापर्यंत काढले जाते. एवढया रकमेत लोखंडी बॅरीकेड्स विकत मिळू शकतात. पण याचा विचार होतचं नाही.
नवरात्राच्या पहिल्याच दिवशी चेंगराचेंगरीत झालेला भाविकाचा मृत्यू, हा प्रशासनाच्या निष्क्रियतेचा बळी ठरलाय. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाच्या कारभाराची सीआयडी चौकशीची मागणी जोर धरु लागली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.