www.24taas.com, धुळे
धुळेकर नागरिक महावितरणच्या वीज बिलांमुळे वैतागले आहेत. वाढत्या महागाईत महावितरणकडून येणारी अव्वाच्या सव्वा बिलांमुळे धुळेकर मेटाकुटीला आलेत. याबाबत स्थानिकांनी महावितरणाला जाब विचारला. मात्र बिलांमध्ये काहीच दोष नसल्याचं सांगत अधिकारी तक्रारदारांना आल्या पायानं माघारी पाठवत आहेत.
बिलांची रक्कम 960 ते 2140 रुपय इतकी येते. सध्या महावितरणकडून येणाऱ्या हजारो रुपयांच्या बिलांमुळं धुळ्यातील नागरिक संतापलेत. राज्य सरकारनं लोडशेडिंगमुक्त केलेल्या विभागात धुळ्याचा समावेश होता. त्यानुसार 6 तासांचं लोडशेडिंग कमी करण्यात आलं. मात्र त्यानंतर महावितरणकडून येणाऱ्या वीजबिलात तिपटीने वाढ झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत...अडीचशे ते तीनशे रुपयांच्या घरात येणारं बील हजारोंच्या घरात गेल्यानं नागरिक महावितरणला जाब विचारतायत..
लोडशेडिंग कमी झाल्यानं मोठ्या प्रमाणात वीजेच्या वापरामुळं बिल वाढल्याचा दावा महावितरणनं केलाय.. त्यामुळं नागरिकांच्या तक्रारी निरर्थक असल्याचं जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सांगत आहेत. वाढत्या वीजबिलाचा फटका सर्वाधिक कष्टकरी वर्गाला बसतोय.. हजार रुपये उत्पन्न असणा-यांनी इतकी वीजबिलं कशी अदा करावीत हा प्रश्न नागरिकांना सतावतोय.. त्यामुळं वाढती वीजबिलं धुळेकरांसाठी डोकेदुखी ठरतायत.